बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा सध्या तिच्या भावाच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच आठवड्यात नीलम उपाध्यायबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नाआधीच्या सर्व विधींनी सुरुवात झाली आहे. बुधवारी सिद्धार्थ आणि नीलमच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. या हळदी सोहळ्यात प्रियांकाने बॉलीवूडच्या काही गाण्यांवर डान्स केला. त्या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आपल्या भावाची हळद असल्याने प्रियांकाने त्या समारंभामध्ये भरपूर मजा करीत भाऊ सिद्धार्थ आणि वहिनी नीलमबरोबर डान्स केला. एका व्हिडीओमध्ये ती बॉलीवूडमध्ये तुफान गाजलेल्या ‘छैया छैया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तसेच तिने ‘आजा माही वे’ या गाण्यावरही डान्स केला.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिद्धार्थ आणि नीलमच्या हळदी कार्यक्रमासाठी प्रियांकाने सुंदर पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच जडशी कर्णफुले घालून साध्या मेकअपमध्ये तिने स्वत:चा लूक पूर्ण केला आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या हळदी सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. तसेच कॅप्शनमध्ये ‘सर्वांत सुंदर हळदी समारंभ’, असे लिहिले आहे.
सिद्धार्थचा कुर्ता फाडलासिद्धार्थचा कुर्ता फाडला
हळदी सोहळ्याला आलेल्या प्रत्येकाने खूप धमाल आणि मजामस्ती केली. सिद्धार्थला हळद लावताना त्याच्या एका मित्राने तर मोठी गंमत केली. त्याने सुरुवातीला नवरीला हळद लावली. त्यानंतर नवरदेवाला हळद लावली. सिद्धार्थला हळद लावताना त्याने मस्करीमध्ये थेट त्याचा कुर्ता फाडला. सोशल मीडियावर सिद्धार्थचा कुर्ता फाडतानाचा व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे.
हळदीमध्ये चोप्रा आणि उपाध्याय अशा दोन्ही कुटुंबांतील व्यक्ती उपस्थित होत्या. तसेच मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनीही या हळदी सोहळ्याला हजेरी लावली होती. नवरा-नवरी दोघांनाही हळद लावतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सिद्धार्थ आणि नीलमच्या हळदी सोहळ्यात व्यग्र असताना प्रियांकाने लेक मालतीबरोबरही वेळ व्यतीत केला. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मालतीबरोबरचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केलेत. एका फोटोत ती मालतीबरोबर देवीचा आशीर्वाद घेत आहे; तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये मालती खेळताना एका उंच रशीवर चढण्याचा प्रयत्न करीत आहे.
प्रियांका चोप्राने सिनेविश्वात तिच्या अभिनयाने मोठे नाव कमावले आहे. तिच्या कामासह सर्व जण तिच्या स्वभावाचेही नेहमी कौतुक करतात. प्रियांका कायम समोरच्या व्यक्तीशी आदराने आणि आपुलकीने संवाद साधते. तिचा साधा आणि गोड स्वभाव भावाच्या हळदीतही पाहायला मिळाला. हळदी सोहळ्यात कारमधून जात असताना समोर आलेल्या पापाराझींना तिने ओठांवर सुंदर हसू आणत नमस्कार केला. प्रियांकाचा हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.