ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून अनेक समाजिक विषयांवर भाष्य करत असते. परदेशात सुरु असलेल्या वादात उडी घेत प्रियांका परदेशात तेथील लोकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध भाष्य करते. त्यावरून बऱ्याचदा तिला ट्रोलही केलं जातं. आताही असंच काहीसं घडलं आहे. प्रियंकाने काही दिवसांपूर्वी इराणमधील महिलांनी हिजाब विरोधात पुकारलेल्या आंदोलनामागच्या त्यांच्या धाडसाचं खूप कौतुक केलं होतं. यासंदर्भात तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्टही शेअर केली होती. पण आता ही पोस्ट करणं प्रियंकाला महागात पडल्याचं दिसून येत आहे.
आणखी वाचा : रणबीर कपूरच्या ‘त्या’ कृतीमुळे सेटवरच रडू लागली रश्मिका मंदाना, म्हणाली, “मी तुझ्याइतकी…”
प्रियांकाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरून तिचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला. प्रियंका चोप्रा भारतीयांना सोडून प्रत्येक देशातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज असते, आपल्या देशात काय चाललंय याचं प्रियंकाला अजिबात घेणंदेणं नाही, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. एका नेटकऱ्याने बिलकिस बानोचा संदर्भ देत लिहिले, “प्रियंकाने इराणच्या महिलांना जे समर्थन दिले ते चांगलेच आहे पण बिलकिस बानोच्या बाबतीत जे घडले जे घडले, आपल्या देशातील इतर महिलांसोबत जे घडत आहे, त्यावर मौन बाळगणे प्रियांकाला शोभते का?”
तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “अमेरिका किंवा इराणमधील समस्यांवर आवाज उठवल्याने प्रियांकाच्या व्यक्तिमत्वाची अमेरिकेत एक ‘जागरूक’ व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण होते. परंतु आपल्या देशातील लोकांच्या भावना दुखावतील या हेतूने आपल्या देशातील मुस्लिम महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ती कधीही बोलत नाही.”
त्यासोबतच “प्रियंका नेहमी इतर देशातील समस्यांवर आवाज उठवते, पण आपल्या देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करायला मात्र तिला त्रास होतो,” अशी तक्रार अनेक नेटकऱ्यांची केली आहे.
हेही वाचा : …आणि प्रियांका चोप्राने भर कार्यक्रमात सेटजवरच निक जोनसला केलं किस, व्हिडीओ तुफान व्हायरल
इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिजाबला विरोध केला जात आहे. महसा अमिनी या मुलीच्या मृत्यूनंतर इराणमधील महिलांनी तेथील सरकार आणि पोलिसांच्या विरोधात आंदोलन पुकारले. महसा अमिनीला इराणच्या पोलिसांनी फक्त हिजाब नीट परिधान केला नाही या कारणाने अटक केली होती. पण त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असताना तिला मारहाण करण्यात आली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता. प्रियंका चोप्राने याच कारणाने इराणच्या महिलांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला.