प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ती शूटिंग सेटवर तिची लाडकी लेक मालतीला नेते. त्यामुळे तिचे सेटवर मस्ती करतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकतीच तिने एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यात तिला अॅक्शन सीन करताना दुखापत झाली होती. उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच प्रियांका उद्योजिकादेखील आहे. तिचं प्रॉडक्शन हाउस आहे. तसेच ती न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टनरही होती. त्याच रेस्टॉरंटबद्दल आता मोठी माहिती समोर आली आहे.
न्यूयॉर्कमधील ‘सोना’ नावाचं हे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रियांकाने काही वर्षांपूर्वी हे रेस्टॉरंट सुरू केलं होतं आणि हे ती पार्टनरशिपमध्ये चालवत होती. पण काही महिन्यांपूर्वी तिने यातून तिची पार्टनरशिप संपवली. आता ‘सोना’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हे रेस्टॉरंट बंद होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ३० जून रोजी हे रेस्टॉरंट कायमचे बंद होईल, असं त्यात लिहिलं आहे.
‘सोना’ रेस्टॉरंटच्या इन्स्टाग्रामवर अधिकृत निवेदन
रेस्टॉरंटच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, “सोना’ची तीन वर्षे खूप चांगली राहिली, पण आता ते बंद होणार आहे. येथील जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या आमच्या सर्व ग्राहकांचे आम्ही आभार मानू इच्छितो. तुमची सेवा करून आम्हाला खूप आनंद झाला. स्वादिष्ट जेवण वाढल्याबद्दल आम्ही आमच्या टीमचे आभार मानतो. सर्वजण नेहमी हसत राहा आणि आनंदी राहा. ३० जून रोजी सोना शेवटचे उघडेल. आम्हाला आशा आहे की तुम्ही शेवटचे इथे याल आणि जेवणाचा आस्वाद घ्याल. आमचे दरवाजे तुमच्यासाठी खुले असतील.”
‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर निराशा, सहा दिवसांत कमावले फक्त…
या रेस्टॉरंटला आजवर अनेक सेलिब्रिटींनी दिली भेट
प्रियांका चोप्राने तीन वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये भारतीय रितीरिवाजांसह या रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं होतं. यामध्ये प्रियांकाच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय इतरही अनेक जण सहभागी झाले होते. हे रेस्टॉरंट चांगले चालत होते. अनेक वेळा बॉलीवूड सेलिब्रिटी इथे यायचे आणि फोटो शेअर करायचे. परदेशात भारतीय पदार्थांचा आस्वाद घेता येतोय, त्यासाठी ते प्रियांकाचे आभार मानायचे. पण आता हे रेस्टॉरंट बंद होणार आहे.
प्रियंका चोप्राने २०२१ मध्ये मनीष गोयलबरोबर भागीदारी करून हे रेस्टॉरंट उघडले. मात्र, काही काळापूर्वी प्रियांकाने तिची भागीदारी संपवली. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक निवेदन प्रसिद्ध करून याची माहिती दिली होती.