बॉलिवूडची देसी गर्ल आता ग्लोबल स्टार झाली आहे. फक्त भारतात नाही तर जगभरात तिने चांगलं नाव कमावलं आहे. प्रियांका चोप्रा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. प्रियांका ही सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या २८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतंच प्रियांकाने अभिनेता शाहरुख खानच्या हॉलिवूडमध्ये सक्रीय होण्याबद्दलच्या प्रतिक्रियेवर भाष्य केले आहे.
नुकतंच पठाण या चित्रपटादरम्यान अभिनेता शाहरुख खानला हॉलिवूडमध्ये काम करण्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी शाहरुख खानने “मी बॉलिवूडमध्ये कम्फर्टेबल आहे. हॉलिवूडपेक्षा बॉलिवूड चांगले आहे”, असे म्हटले होते. त्यावर आता प्रियांकाने प्रत्युत्तर देत हॉलिवूडबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “तू मीठ घेऊन यात पडलीस का?” अभिज्ञा भावेने सांगितला पतीबरोबरच्या भेटीचा ‘तो’ किस्सा
प्रियांकाने नुकतंच ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला शाहरुख खानच्या हॉलिवूडच्या उत्तराबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली, “कम्फर्टेबल राहणे हे माझ्यासाठी फार कंटाळवाणे आहे. मला गर्व नाही. पण माझा माझ्या स्वत:वर खूप जास्त विश्वास आहे. जेव्हा मी सेटवर जाते, तेव्हा मी काय करत आहे, याची मला पूर्ण कल्पना असते. मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. मी एका देशातल्या माझ्या यशाचं ओझं दुसऱ्या देशात नेत नाही.”
“मी खूप प्रोफेशनल आहे. जर तुम्ही माझ्या आजूबाजूच्या लोकांना विचाराल तर तेही हेच सांगतील. मी माझ्या प्रोफेशनल कामांसाठी ओळखली जाते. मला याचा अभिमान आहे. माझे वडील सैन्यात होते आणि त्यांनी मला शिस्तीचे मूल्य शिकवले. ते अनेकदा सांगायचे की तुला जे काही मिळाले आहे त्याचा तू अभिमान बाळगायला हवा. कोणत्याही गोष्टीला हलक्यात घेऊ नका. त्या गोष्टींची हवा तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका, असे माझे वडील सांगायचे.
आज माझे सिनेसृष्टीत जे काही स्थान आहे, ते केवळ आणि केवळ मेहनतीमुळेच मिळाले आहे. मी कोणत्याही अनावश्यक आणि निरुपयोगी गोष्टींमध्ये माझा वेळ वाया घालवत नाही. मी नेहमी तिच्या कामावर लक्ष केंद्रित करते”, असेही प्रियांकाने यावेळी म्हटले.
दरम्यान प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियांकाने २००२ मध्ये एका तामिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर २०१६मध्ये तिने हॉलिवूड चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये ‘द स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटात तिने काम केले होते.