Priyanka Chopra : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये तिच्या अभिनयाची जादू दाखवत आहे. प्रियांका बॉलीवूडपासून दूर असली तरी तिचे आधीचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. प्रियांका कोणतेही पात्र अगदी चोखपणे साकारते. त्यामुळे प्रत्येक कामासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो. प्रियांकाचा ‘क्रिश’ चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. या चित्रपटासाठी तिची निवड करताना राकेश रोशन यांनी तिला एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू असताना पाहिले होते. अभिनेत्रीने स्वत: याबद्दल सांगितले आहे.
राकेश रोशन दिग्दर्शित ‘क्रिश’ चित्रपट २००६ मध्ये रुपेरी पडद्यावर आला होता. त्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा व हृतिक रोशन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्या काळी हा अॅक्शन चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. तरुणांनाच नाही, तर अगदी लहान मुलांनासुद्धा या चित्रपटाने भुरळ घातली होती. नुकतीच प्रियांका ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ (RSIFF) या आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दिसली. त्यावेळी तिने ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली याची आठवण सांगितली.
हेही वाचा : सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
‘क्रिश’ चित्रपटासाठी अशी झाली प्रियांकाची निवड
सफेद रंगाचे कपडे परिधान करून एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या प्रियांकाने राकेश रोशन यांचे लक्ष वेधले होते. तिचा साधेपणा पाहून राकेश रोशन यांना ती आपल्या ‘क्रिश’ चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारण्यासाठी योग्य आहे, असे वाटले. त्यांनी लगेचच दिग्दर्शक अब्बास मस्तान यांना प्रियांकाचे ‘ऐतराज’ चित्रपटातील काही फोटो दाखवण्यास सांगितले.
प्रियांकाने सांगितले, “मला भीती वाटली की, या चित्रपटामध्ये मला घेतलं जाणार नाही. कारण- ‘ऐतराज’मध्ये माझी भूमिका वेगळी होती. तसेच प्रिया हे पात्र फार साधं होतं. त्यामुळे मला ही भूमिका मिळणार नाही, अशी भीती माझ्या मनात होती.”
“मात्र, राकेश रोशन यांनी फक्त ‘ऐतराज’मधील माझी भूमिका न पाहता, माझं काम पाहिलं.”, असं प्रियांका म्हणाली. पुढे तिने सांगितलं, “राकेश रोशन म्हणाले, मी तुम्ही साकारलेली भूमिका पाहत नव्हतो, मी हे पाहत होतो की, तुम्ही किती प्रामाणिकपणे तुमच्या कामाला न्याय देत आहात. तुम्ही एक हरहुन्नरी अभिनेत्री आहात आणि मला माहीत आहे की, तुम्ही कोणतंही पात्र अगदी सहज साकारू शकता.” ‘क्रिश’मध्ये झळकल्यानंतर प्रियांका पुढे ‘क्रिश ३’मध्येही प्रिया हे पात्र साकारताना दिसली.
हेही वाचा : “मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने बॉलीवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. ‘मुझसे शादी करोगी’, ‘किस्मत’, ‘डॉन’, ‘बर्फी’, ‘अग्निपथ’, ‘दिल धडकने दो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. सध्या हॉलीवूड सिनेविश्वात ती तिच्या अभिनयाने यशाचे शिखर गाठत आहे.