अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या निमित्ताने प्रियांका मुलाखती देत आहे, ज्यामध्ये ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देते. ३० व्या वर्षी आपण बीजांड गोठवले होते, असा खुलासा प्रियांकाने केला होता, त्यानंतर आता लेकीच्या जन्मानंतर आलेल्या अडचणींवर भाष्य केलं आहे. प्रियांका चोप्रा व निक जोनस २०२२ मध्ये लेक मालती मेरीचे पालक बनले होते.
‘एले मॅजझीन युएसए’शी बोलताना प्रियांका चोप्राने सांगितलं की गेल्या वर्षीचा मदर्स डे तिच्यासाठी खास होता, कारण तिची मुलगी मालती १०० दिवस NICU मध्ये राहून घरी आली होती. प्रियाका म्हणाली, “मालतीने तिचा हात माझ्या बोटाभोवती गुंडाळला होता. मला हे देखील माहीत नाही की मी तिला काय व कशी शिस्त लावेन, कारण माझ्यातच नाही. मी तिला खूप वेळा गमावण्याच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे मला तिला फक्त आनंदी पाहायचं आहे. तिने नेहमी आनंदी राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. ती सतत हसणारी, आनंदी मुलगी आहे आणि तिला आनंदी पाहणे हे माझे एकमेव ध्येय आहे.”
हेही वाचा – शिव ठाकरेने दिली सत्या मांजरेकरच्या नवीन हॉटेलला भेट, फोटो शेअर करत म्हणाला…
“जेव्हापासून मी आई झाले आहे, तेव्हापासून मी आपल्या मुलीवर किती प्रेम करू शकते आणि तिची काळजी घेऊ शकते हे पाहून मलाच आश्चर्य वाटते. ज्या गोष्टी एकेकाळी आई मधू चोप्रा यांना सहन कराव्या लागल्या होत्या, त्या आता आई झाल्यानंतर मला समजत आहेत,” असंही प्रियांकाने सांगितलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा पती निक व लेक मालतीबरोबर भारतात आली होती. यावेळी ती मुलीला घेऊन सिद्धीविनायकाच्या दर्शनालाही गेली होती.