अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलीवूड सिनेमात काम करायला लागल्यापासून फार कमी वेळा बॉलीवूड सिनेमात दिसली आहे. प्रियांका चोप्रा विविध कार्यक्रमांसाठी भारतात येत असते आणि तेथील फोटो पोस्ट करत असते. असे असले तरी या ‘देसी गर्ल’च्या चाहत्यांना तिला आता देशी सिनेमात पाहण्याची उत्सुकता लागली आहे. कारण प्रियांका चोप्रा ‘स्काय इज पिंक’ या २०१९ साली आलेल्या हिंदी चित्रपटात शेवटची दिसली होती. गेली ५ वर्षे ती कुठल्याही हिंदी किंवा भारतीय सिनेमात दिसली नव्हती. मात्र आता प्रियांका लवकरच भारतीय चित्रपटात पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याने प्रियांका तब्बल ८ वर्षांनी भारतीय चित्रपटात पुनरागमन करणार आहे.
प्रियांका चोप्रा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिगदर्शक एस एस राजामौली यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. विशेष म्हणजे प्रियांकाने सिनेसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपटातूनच पदार्पण केले होते. आता ती पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटातून भारतीय सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहे.
एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपट SSMB29 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिका साकारणार असून हा चित्रपट रोमान्स आणि थ्रिलरवर आधारित असेल, अशी अपेक्षा आहे. अलीकडेच राजामौली यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, त्यात एका व्हिडीओने त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडीओमध्ये एका सिंहाचा फोटो होता, यात राजामौली असून ते त्यांच्या हातात भारतीय पासपोर्ट होता. व्हिडीओमध्ये सिंहाचा फोटोवर पिंजरा येतो, राजामौली यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “Captured” (कैद).
राजामौली यांनी पोस्ट टाकल्यानंतर लगेचच प्रियांका चोप्रा आणि महेश बाबू यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. प्रियांका चोप्राने लिहिले, “Finally” (शेवटी), तर महेश बाबूने तेलुगूमध्ये कमेंट केली, “ओक्कसारी कमिट आयथे ना माटा नेने विनानु” (एकदा मी कमिटमेंट केली की मी फक्त फक्त माझंच ऐकतो).

महेश बाबू आणि एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट SSMB29 चे अधिकृतपणे काम सुरू झाले आहे असे वृत्त ‘न्यूज १८’ ने दिले . महेश बाबू आणि प्रियांका चोप्राच्या या जोडीवर सर्वांचे लक्ष केंद्रित असले, तरी हा चित्रपट जगभरातील विविध प्रतिभावान कलाकारांना एकत्र आणणार आहे. मात्र, चित्रपटाची पूर्ण कास्ट आणि क्रूची घोषणा अद्याप झाली नसल्यामुळे चाहते पुढील अपडेट्सची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, प्रियांका चोप्रा या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आधीच हैदराबादमध्ये पोहोचली आहेत अशा चर्चा आहेत. याआधी, तिने चिल्कुर बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि या नवीन प्रकल्पासाठी आशीर्वाद मागितले. तिने इन्स्टाग्रामवर दर्शनाचे काही फोटो शेअर केले. प्रियांका चोप्राने या फोटोंसह कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “श्री बालाजींच्या आशीर्वादाने एका नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे. आपल्यातील प्रत्येकाच्या हृदयात शांतता, समृद्धी नांदो. देवाची कृपा असीम आहे. ॐ नमो नारायणाय.” तिच्या पोस्टवरील कॅप्शनमधून तिने तिच्या नव्या सिनेमासाठी आशीर्वाद घेतल्याची चर्चा आहे.