बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचं मंगळवारी (८ एप्रिल) मुंबईत निधन झालं आहे. त्यांनी ‘फुल और अंगारे’ (१९९३) आणि ‘कयामत’ (१९८३) यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मिती केली होती. ते ८२ वर्षांचे होते. सलीम अख्तर यांच्या पश्चात त्यांची पत्नी शमा अख्तर आणि त्यांचा मुलगा समद अख्तर असा परिवार आहे.

निर्माते सलीम अख्तर यांनी राणी मुखर्जीला १९९७ मध्ये ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटाद्वारे लॉन्च केलं होतं. यानंतर अभिनेत्री तमन्ना भाटियाने २००५ मध्ये त्यांच्या ‘चंदा सा रोशन चेहरा’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं होतं.

सलीम अख्तर यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात ‘आफताब पिक्चर्स’ या त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती केली. ‘चोरों की बारात’, ‘कयामत’, ‘लोहा’, ‘बटवारा’ आणि ‘फूल और अंगारे’, ‘बाजी’, ‘इज्जत’ आणि ‘बादल’ अशा अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे.

मंगळवारी ८ एप्रिल रोजी संध्याकाळी सलीम अख्तर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते, अखेर मंगळवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आज ( बुधवारी ९ एप्रिल ) सलीम अख्तर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या पत्नी शमा अख्तर यांनी दिली. बॉलीवूड सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.