सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाचा प्रदर्शित होताच त्यावर टीका होत आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटाची कथा चार महिलांची आहे ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.
चित्रपटाच्या टीझरमध्ये केरळमधील तब्बल ३२००० महिलांनी कथितपणे इस्लाम धर्म स्वीकारला असून त्यांना दहशतवादी संघटनेने भरती केल्याचे दाखवण्यात आले आहे. निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी नुकतंच या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. विपुल म्हणतात की त्यांचा चित्रपट ‘लव्ह जिहाद’बद्दल नाही. तर तो केरळमधील ३२००० पीडित महिला आणि मुलींची व्यथा मांडतो.
आणखी वाचा : शाहरुखच्या ‘जवान’बद्दल मोठा खुलासा; अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ चित्रपटापासून प्रेरित असू शकतं कथानक
केरळ राज्याचे नकारात्मक चित्रण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत राजकीय पक्षांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. सीपीआय-एम आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने केरळमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संघ परिवाराचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या संपूर्ण वादावर चित्रपट निर्माते विपुल शाह यांनी ‘ईटाईम्स’शी खास संवाद साधला. विपुल म्हणाले, “हा चित्रपट एका मुलीच्या सत्यघटनेवर आधारित आहे. लव्ह जिहाद वगैरे हे सगळे लोकांनी तयार केलेले राजकीय शब्द आहेत. आमचा चित्रपट या पीडित मुलींच्या जीवनावर आधारित आहे. आम्ही सत्य दाखवत आहोत. आता यासाठी तुम्हाला कोणता शब्द निवडायचाय तो तुमचा निर्णय आहे. या पीडित मुलींसाठी आपण आवाज उठवला पाहिजे हेच या चित्रपटात सांगितलं आहे.”
या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी या चार अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ५ मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.