आधी ‘पठाण’ अन् आता ‘जवान’ अशा दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा किंग खान शाहरुख खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. दोन्ही चित्रपटांनी १००० कोटींचा टप्पा पार केल्याने आता शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाकडून असणाऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘डंकी’च्या माध्यमातून शाहरुख खान व राजकुमार हिरानी हे प्रथमच एकत्र काम करणार आहेत.
‘डंकी’ची कथा ही आपल्या देश सोडून परदेशात स्थलांतरित झालेल्या लोकांवर बेतलेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कधी दिवसांपूर्वी प्रभासच्या बहुचर्चित ‘सलार’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली अन् यामुळे शाहरुखच्या ‘डंकी’वर परिणाम होणार अशी चर्चाही होऊ लागली.
प्रभासचा ‘सलार’ २२ डिसेंबरला येणार आहे अन् यामुळेच ‘डंकी’चे निर्माते त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. आता मात्र एक नवी अपडेट समोर येत आहे. मीडिया रीपोर्टनुसार ‘डंकी’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाणार नसून ठरलेल्याच दिवशी तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे हे स्पष्ट झालं आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी २०२३ च्या क्रिसमसची तारीख निश्चित केली असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
यामुळे शाहरुखचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. येत्या डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर साऊथ विरुद्ध बॉलिवूड अशी झुंज आपल्याला बघायला मिळू शकते. किंग खानचे चाहते आणि सिनेप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘डंकी’मध्ये शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.