आज टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटो एवढा महाग झाला आहे की, तो विकत घेताना सर्वांना विचार करावा लागत आहे. याच टोमॅटोने एके काळी चित्रपटांमध्ये टोमॅटोचा फेस्टिव्हल दाखवला जायचा. याचं एक उदाहरण म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट. या चित्रपटातील एका गाण्यात हृतिक रोशन, कतरिना कैफ आणि फरहान अख्तर अनेक लोकांबरोबर टोमाटिना फेस्टिव्हल साजरा करताना दिसले. या एका गाण्यावर कोट्यावधींचा खर्च करण्यात आला होता.
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट बॉलीवूडमधील लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत सामील आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १२ वर्षे झाली आहेत. आजही या चित्रपटातील प्रत्येक दृश्य प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विशेषत: ‘एक जुनून’ या गाण्यातील दृश्यं. या गाण्यात हृतिक रोशन, कतरिना कैफ, फरहान अख्तर आणि अभय देओल एकमेकांवर टोमॅटो फेकताना दिसतात.
निर्माते रितेश सिधवानी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी या गाण्याबद्दल मोठा खुलासा केला होता. रितेश म्हणाले होते की, हा सीक्वेन्स खराखुरा दिसण्यासाठी त्यांनी पोर्तुगालमधून १६ टन (१६ हजार किलो) टोमॅटो आणले आहेत. हा सीन स्पेनच्या बुनियोल शहरात शूट करण्यात आला आहे. त्यावेळी स्पेनमध्ये पिकलेले टोमॅटो उपलब्ध नव्हते, म्हणून त्यांनी थेट पोर्तुगालमधून टोमॅटो मागवले.
हेही वाचा : Katrina Kaif birthday: कोण म्हणेल ही चाळिशीची आहे! जाणून घ्या कतरिना कैफचं फिटनेस सिक्रेट
चित्रपटातील हा सिक्वेन्स शूट करण्यासाठी तब्बल एक कोटी खर्च करण्यात आले. यामध्ये टोमॅटोच्या किंमतीबरोबरच पोर्तुगाल मधून स्पेन मध्ये त्यांना घेऊन येण्याची किंमतही सामील आहे. या गाण्यासाठी या चित्रपटाचे दिग्दर्शिका झोया अख्तर हिने आख्खं शहर बुक केलं होतं.