लोकप्रिय बंगाली अभिनेते प्रोसेनजीत चॅटर्जी (Prosenjit Chatterjee) सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ‘अजोग्यो’ नावाचा त्यांचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा त्यांचा अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ताबरोबरचा हा त्यांचा ५० वा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी ‘चोखेर बाली’ नावाच्या सिनेमाचा उल्लेख केला. यामध्ये प्रोसेनजीत व ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांनी एकत्र काम केलं होतं.
प्रोसेनजीत चॅटर्जी आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी ‘चोखेर बाली’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या आणि यामध्ये दोघांनी काही रोमँटिक आणि बोल्ड सीन्सही शूट केले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याबरोबर काम करण्याचा अनुभव प्रोसेनजीत यांनी सांगितलं आहे. ऐश्वर्या खूप चांगली व्यक्ती आहे आणि तिच्याशी अधूनमधून भेट होत राहते असं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर ऐश्वर्याचं त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि तिला नाश्त्यात काय खायला आवडतं याबाबतही माहिती दिली.
ऐश्वर्या व प्रोसेनजीत यांनी एकत्र केलेला चित्रपट
“ऐश्वर्या राय खूप चांगली आहे. तिच्याबरोबर काम करणं खूप जादुई होतं. आम्ही अजूनही कधीकधी भेटतो,” असं प्रोसेनजीत म्हणाले. ऐश्वर्याला बंगाली नाश्ता आवडतो, असं त्यांनी सांगितलं. प्रोसेनजीत म्हणाले, “मी आणि रितू ‘चोखेर बाली’च्या सेटवर खूपदा भांडायचो. आम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बंगाली कचोरी आणि मिठाई मागवायचो. ऐश्वर्या या पदार्थांचा आस्वाद घ्यायची आणि आमची भांडणं बघायची. नंतर म्हणायची की ‘तू एवढा मोठा हिरो आहेस आणि ती आघाडीची दिग्दर्शक आहे, मग तुम्ही दोघे सेटवर भांडत का राहता?'” प्रोसेनजीत यांनी ऐश्वर्याचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चनचेही खूप कौतुक केले.
कोण आहेत प्रोसेनजीत चॅटर्जी?
प्रोसेनजीत यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते प्रसिद्ध बंगाली अभिनेते आणि निर्माते आहेत. मागच्या ४० वर्षांहून अधिक काळापासून ते प्रेक्षकांचं आपल्या अभिनयाने मनोरंजन करत आहेत. ते ज्येष्ठ अभिनेते विश्वजित चॅटर्जी यांचे सुपूत्र आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून ‘छोटो जिग्यासा’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. १९८३ मध्ये आलेला ‘दुती पाता’ या हा त्यांचा मुख्य अभिनेता म्हणून केलेला पहिला चित्रपट होता. त्यांनी आजवर अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे, काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.