बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या भारतात युनिसेफचं काम करत आहे. सोमवारी तिने लखनऊमधील युनिसेफच्या ऑफिसचा दौरा केला. याशिवाय तिने कम्पोजिट स्कुल औरंगाबाद आणि एका आंगणवाडी केंद्रालाही भेट दिली आणि तिथल्या लहान मुलांशी संवाद साधला. या संपूर्ण दौऱ्यात प्रियांका चोप्रा उत्तर प्रदेशातील मुलींच्या विरोधात होणारी हिंसा आणि भेदभाव संपवण्यासाठी युनिसेफने केलेल्या कामाचा आढावा घेताना दिसली. पण याचवेळी लखनऊमध्ये प्रियांका चोप्राच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली. पण असं काय कारण होतं ज्यामुळे प्रियांका चोप्राला एवढा विरोध झाला.
प्रियांका चोप्रा लखनऊमधील १०९० चौकात असताना तिला भेटण्यालाठी १०९० वुमेन पॉवर लाइनची भिंत ओलांडून एक तरुण आला होता. ज्याला नंतर अटक करण्यात आली. याशिवाय प्रियांका चोप्राच्या लखनऊ दौऱ्याच्या विरोधात एक संघटनेनं संपूर्ण शहरात ‘नवाबांच्या शहरात तुझं स्वागत नाही.’ अशा आशयाचे पोस्टर लावले होते. याशिवाय गोमतीनगरमध्ये प्रियांका चोप्राच्या बॉयकॉटचे पोस्टर लावण्यात आले होते. यावरून स्पष्ट होतं की प्रियांकाच्या लखनऊ दौऱ्याचा लोकांना फारसा काही आनंद झालेला नाही. मात्र हे सर्व का करण्यात आलं किंवा यामागे कोण आहे? याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. पण याचा आता पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
आणखी वाचा- मुंबई सोडून पुन्हा कुठे निघाली प्रियांका चोप्रा? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “घरी पुन्हा…”
दरम्यान त्याआधी प्रियांका चोप्राने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती म्हणाली होती, “मी युनिसेफसाठी लखनऊमध्ये आलेय. मी खरंच लखनऊ दौऱ्याची वाट पाहत होते. मी बालपणी काही वर्षे लखनऊमधील शाळेत घालवली आहेत. इथे माझे नातेवाईक आणि मित्रपरिवार आहे आणि उत्तर प्रदेशातील महिला आणि मुलांसाठी ही जागा कशी चांगली ठरत आहे हे समजून घेण्याची मला उत्सुकता आहे. तंत्रज्ञान आणि नावीन्य या बदलाला मोठ्या प्रमाणात कशाप्रकारे चालना देत आहेत हे मला प्रत्यक्षात पाहायचं आहे. लैंगिक असमानतेमुळे संपूर्ण भारतामध्ये असमान संधी निर्माण होताना दिसत आहेत आणि या संधीपासून सर्वात जास्त मुली वंचित राहत आहेत.”
आणखी वाचा- ‘मिस वर्ल्ड २०००’च्या विजेतेपदाचं आधीच झालेलं फिक्सिंग, प्रियांका चोप्रावर गंभीर आरोप
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मुलींबरोबर होणारा हिंसाचार आणि भेदभाव संपवण्याचे काम पाहण्यासाठी आम्ही युनिसेफच्या अनेक भागीदारांना भेटणार आहोत. दैनंदिन जीवनात त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांबद्दल मी ऐकणार आहे आणि त्यावर उपाय शोधण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपायांची गरज आहे. मी अनेकदा म्हटल्याप्रमाणे, स्त्रिया आणि मुली हे केवळ स्वत:चेच नव्हे तर त्यांच्या समुदायाचे चांगले भविष्य घडवण्याची गुरुकिल्ली आहेत.”
दरम्यान प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचं तर आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याबरोबर ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत बोलताना प्रियांका म्हणाली, “मी माझ्या करिअर बराच मोठा काळ अशा परिस्थिती घालवला आहे. जिथे आम्ही नेहमीच पुरुषांसाठी तयार राहायचो. त्यावेळी अभिनेते ठरवायचे की चित्रपट कुठे शूट केला जाणार, कोणाला कास्ट करायचं, काय होणार आहे. पण आता हे सगळं बदलतंय. महिलांना काय हवंय हे आता त्या उघडपणे मांडू शकत आहेत.”