Pushpa 2 Review : उत्तम मिसळ खायला जावं आणि चमचमीत तिखट रस्सा मिळण्याऐवजी फक्त त्याच्या नावाखाली वाफाळलेलं गरम पाणी आलं तर काय वाटेल? साबुदाण्याची खिचडी खाताना गारेचे खडेच खडे लागले तर कसं वाटेल? गॅसचा फुगा दिसतो खूप छान पण तो उंचवर जाताना पाहण्यात एक मजा असते. पण असा फुगा उंच आकाशात जाण्याआधीच १०-१५ फुटांवरच फुटला तर काय होईल? हे विचारण्याचं कारणही तसंच आहे. ‘पुष्पा 2’ नावाचा ( Pushpa 2 ) अल्लू अर्जुनचा सिनेमा म्हणजे हे तीन अनुभव घेण्यासारखाच आहे. ‘पुष्पा 2’ अर्थात ‘पुष्पा द रुल’ सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमारने केलं आहे. मात्र हा सुकुमारचा सुमारपट आहे असंही या सिनेमाबाबत म्हणता येईल.
पुष्पा 2 सिनेमा बघायचा म्हणजे सहनशक्तीच हवी
पुष्पा 2 ( Pushpa 2 ) जपानमधून सुरु होतो आणि चित्तूरमध्ये संपतो. संपतो म्हणजे खरंतर तिसऱ्या पार्टसाठी पुन्हा सुरुच होतो. पण ३ तास १० मिनिटांच्या काळात आपण प्रेक्षक म्हणून सिनेमा अक्षरशः सहन करत राहतो. अल्लू अर्जुन पुष्पाच्या आधीच्या अॅटीट्यूडमध्येही नीटसा वावरलेला नाही. काही प्रसंग उत्तम जमले आहेत. बाकी सिनेमा ३ तास १० मिनिटं सुरु असतो म्हणून पहावा लागतो असाच आहे. फहाद फासिलचा व्हिलन म्हणजेच भंवर सिंह या भागात स्ट्राँग असेल असं वाटलं होतं कारण पुष्पा दर बिगनिंगच्या शेवटाकडे त्याची एंट्री झाली होती पण तो व्हिलनपेक्षा कॉमेडियन जास्त वाटतो. त्यामुळे त्याचा व्हिलनही रंगलेला नाही. पुष्पा द बिगनिंगला कथा होती, कथाबीज होतं. गाणी सुंदर होती, सिनेमाला हवा असतो तसा मसाला होता पण पुष्पा 2 ( Pushpa 2 ) मध्ये फक्त कुरघोडी आहे, अॅक्शन सीन आहेत आणि अपेक्षित असणारा शेवट आहे.
अतर्क्य आणि कथा हरवलेला सिनेमा
पुष्पा अर्थात पुष्पराज इतका बलाढ्य दाखवला गेला आहे की तो फक्त एक छोटासा प्रसंग ( Pushpa 2 ) घडल्याने आणि त्यात त्याचा अपमान झाल्याने थेट मुख्यमंत्री वगैरे बदलतो. या आणि अशा अनेक अतर्क्य गोष्टी सिनेमांत आहेत. सिनेमा सुरु झाल्यानंतर आपली पकड घेत नाही. प्रेक्षक म्हणून आपण सिनेमाशी कनेक्ट होत नाही त्यामुळे दर पाच मिनिटांनी अॅक्शन सीन. पुष्पराजची काहीतरी कुरघोडी या सगळ्यात आपली प्रेक्षक म्हणून फरफट होत राहते. कॅमेरा वर्क उत्तम आहे हीच काय ती जमेची बाजू पण त्यासाठी ३ तास १० मिनिटांचा सिनेमा सहन करायचा म्हणजे प्रेक्षकांच्या सहनशक्तीची अग्निपरीक्षा आहे.
‘पुष्पा द बिगनिंग’ जास्त सरस!
रक्तचंदन, त्याची होणारी तस्करी, सिंडिकेट, पुष्पा, त्याची प्रेमकहाणी या सगळ्याभोवती ‘पुष्पा द बिगनिंग’ची कथा मस्तपैकी गुंफली होती. मात्र सिक्वलमध्ये सगळंच फसलं आहे. सिनेमाला कथा नावाचा काही प्रकारच नाही. गाण्यांमध्येही तेच झालं आहे. ‘पुष्पा २’ ( Pushpa 2 ) मधली गाणी म्हणजे त्रास आहेत. ‘पिलिंग्स’ हे गाणं म्हणजे पती-पत्नीने शय्यासोबत करण्याआधी काय काय आसनं करता येतील याचं उत्तम उदाहरण आहे जे सहन करावं लागतं. ‘किसिक’ नावाचं आयटम साँग आहे ते देखील अकारण येतं. ‘अंगारोका अंबरसा लगता है मेरा सामी’ हे एक गाणं सोडलं तर बाकी गाणी घुसडली आहेत. अगदी टायटल साँगही.. त्या गाण्यांना अर्थ नाही. ती येतात आणि आपण सहन करतो.
हे पण वाचा- Pushpa 2 Collection: पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी कमाईत घट, ‘पुष्पा 2’ चे एकूण कलेक्शन किती? वाचा
रश्मिका मंदाना अत्यंत मख्ख चेहऱ्याने वावरली आहे
अभिनयाबाबत बोलायचं झालं तर रश्मिका मंदाना अत्यंत मख्ख चेहऱ्याने वावरली आहे. तिचा अभिनय फक्त सीनमध्ये चांगला झाला आहे. बाकीचा सिनेमाभर ती सामी सामी करत राहते आणि ते डोक्यात जातं. अल्लू अर्जुनचे फाईट सिक्वेन्स चांगले झाले आहेत पण अभिनयात त्यानेही मार खाल्ला आहे. तो जेव्हा देवीच्या रुपात नाच करतो ते पाहून कांताराची आठवण येते. पण तो नाच त्याने फक्कड जमवला आहे. फहाद फासिलची प्रवृत्ती ही लांडग्यासारखी आहे असं पहिल्या पार्टमध्ये वाटलं होतं. पण त्याचं या सिनेमात अक्षरशः माकड झालंय असं वाटून जातं. सॉरीचा एक प्रसंग सोडला तर अभिनयाच्या बाबतीत त्यानेही सपाटून मार खाल्ला आहे. बाकी त्याचा शेवट जसा होतो तेदेखील हास्यास्पदच आहे. इतर कलाकारांबाबत काही लिहिणंही दुरापास्त वाटतं आहे अशा पद्धतीने हे लोक पडद्यावर वावरले आहेत.
बाहुबली 2 चं किंवा इतर सिक्वल्सचं जे झालं तेच पुष्पा 2 चं झालं आहे
बाहुबली 2 आणि इतर सिक्वल्सचं जे होतं तेच पुष्पा 2 चं झालं आहे. सिनेमा प्रेक्षक म्हणून आपल्याला आपला वाटत नाही. अल्लू अर्जुनसाठी बघावा म्हटलं तरीही सहन होत नाही. रश्मिका मंदानासाठी सिनेमा पाहावा असंही काही नाही. त्यामुळे पुष्पा 2 ( Pushpa 2 ) हा मनोरंजनाच्या पातळीवर दे सुमार पट ठरतो. दिग्दर्शक सुकुमारच्या नावे या सुमारपटाची नोंद झाली आहे हे नक्की. संपूर्ण सिनेमा सहन केल्यानंतर शेवटी धक्कातंत्राचा वापर करण्यात आला आहे. हा धक्का पुढच्या पार्टची सुरुवात आहे. आता येणारा पार्ट धक्कादायक असेल की असाच सुमारपट असेल हे पाहणं रंजक असणार आहे. मात्र पुष्पा 2 ( Pushpa 2 ) म्हणजे कुछ जमाँ नही बॉस असाच आहे. इसमे ड्रामा है, कॉमेडी है, अॅक्शन भी है पण कथाच नाही… त्यामुळे सुकुमारचा सुमारपट पाहण्यासाठी लोक इतकी गर्दी का करत आहेत हे अनाकलनीय आहे.