Pushpa 2 Runtime Out & Advance Booking : ‘पुष्पा २’ प्रदर्शित होण्यासाठी आता फक्त ७ दिवस उरले आहेत. येत्या ५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. तब्बल तीन वर्षांपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. याशिवाय पुष्पा अन् श्रीवल्लीची केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘पुष्पा: द राइज’च्या यशानंतर आता लवकरच ‘पुष्पा २ : द रुल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुरुवातीला ‘पुष्पा २’ ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण, तांत्रिक बाबींमुळे या सिनेमाचं प्रदर्शन मेकर्सकडून पुढे ढकलण्यात आलं. अल्लू अर्जुनने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिकाने पाच वर्षांचा प्रवास आता संपला असल्याचं म्हटलं आहे. आता दुसऱ्या भागात कोणता ‘पुष्पाराज’ पाहायला मिळणार याचा उलगडा ५ डिसेंबरला होणार आहे.
‘पुष्पा २’साठी सुरू होणार ॲडव्हान्स बुकिंग
‘Pushpa 2’ चित्रपटासाठी देशभरात ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे. आजवर प्रभासच्या ‘बाहुबली २’साठी रेकॉर्डब्रेक बुकिंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर यशच्या ‘केजीएफ २’चा नंबर लागतो. यासाठी ८० कोटींहून अधिक ॲडव्हान्स बुकिंग झालं होतं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा ‘RRR’ सिनेमा आहे, यासाठी ५८ कोटींचं ॲडव्हान्स बुकिंग करण्यात आलं होतं. आता ‘पुष्पा २’ साठी येत्या ३० नोव्हेंबरपासून ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचं बजेट ४०० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे निर्मात्यांना ‘Pushpa 2’ रेकॉर्डब्रेक कमाई करून हजार कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल अशी आशा आहे. तसेच हा बहुचर्चित चित्रपट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सुद्धा एक नवीन रेकॉर्ड करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘पुष्पा २’ ( Pushpa 2 ) हा देशातील सर्वाधिक लांबीचा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा रनटाइम तब्बल ३ तास २१ मिनिटं असण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. नुकतंच शूटिंग संपल्याने चित्रपटाचा रनटाइम ३ तास २१ मिनिटांपर्यंत असेल असं बोललं जात आहे.