आर. माधवन हा सिनेसृष्टीतील बहुआयामी अभिनेता आहे. त्याचा जन्म १ जून १९७० रोजी झाला होता. आज या लोकप्रिय अभिनेत्याचा ५३ वा वाढदिवस आहे. आर. माधवन या नावाने सर्व जण त्याला ओळखतात. याचबरोबर अनेक जण त्याला ‘मॅडी’ या नावानेही हाक मारतात. चित्रपटांमध्येही तो त्याचं नाव आर. माधवन असंच लावतो. पण त्याचं पूर्ण नाव काय आहे, हे जाणून घेण्याचं सर्वांना कुतूहल आहे.
आर. माधवनचा जन्म जमशेदपूर येथे एका तमिळ कुटुंबात झाला. त्याचे वडील टाटा स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचे, तर आर. माधवनची आई बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होती. त्याने मुंबईच्या केसी कॉलेजमधून पब्लिक स्पीकिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि त्याशिवाय त्याने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं.
यानंतर त्याने १९९६ साली ‘इस रात की कोई सुबह नहीं’ या हिंदी फीचर फिल्ममध्ये त्याने एक छोटीशी भूमिका साकारली. तर यानंतर तो ‘इन्फर्नो’ या इंग्लिश चित्रपटात साहाय्यक पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत झळकला. त्यानंतर त्याने १९९८ साली ‘शांती शांती शांती’ या कन्नड चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रहना हैं तेरे दिल में’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने हिंदी, तमिळ, कन्नड भाषेतील अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
हेही वाचा : ‘रॉकेट्री’ चित्रपटाची निर्मिती करताना आर माधवनने गमावले आपले घर? अभिनेत्याने केला खुलासा
सर्व चित्रपटांमध्ये आतापर्यंत त्याने त्याचं नाव आर. माधवन असं लावलं आहे. पण त्याचं पूर्ण नाव रंगनाथन माधवन असं आहे. त्याच्या वडिलांचं नाव आर. अय्यंगार आहे, तर आईचं नाव आर. सरोजा असं आहे.