‘३ इडियटस’, ‘शैतान’, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतील अभिनयासाठी आर. माधवन(R Madhavan) ओळखला जातो. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. बॉलीवूडसह तो तमीळ चित्रपटांतही काम करतो. मात्र, अभिनेत्याच्या आयुष्यात अशी एक वेळ आली होती, ज्यावेळी आर. माधवनने अभिनयातून ब्रेक घेतला होता. एका मुलाखतीत त्याने अभिनयातून ब्रेक घेण्याचे कारणही सांगितले होते. त्याने हा निर्णय घेण्यास एक घटना कारणीभूत असल्याचाही खुलासा केला होता.

स्वित्झर्लंडमधील शेतकरी माझ्याकडे तिरस्काराने…

आर. माधवनने ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “मी ब्रेक घेतला. कारण- ज्या प्रकारचे मी चित्रपट करीत होतो, त्यामुळे माझी निराशा झाली होती. मी तमीळ गाण्याचे स्वित्झर्लंडमध्ये शूटिंग करीत होतो. केसरी रंगाची पँट आणि हिरव्या रंगाचा शर्ट घातला होता. मी गाण्यावर डान्स करीत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगवेळी मी रस्त्याच्या मधोमध होतो. तिथे एका शेतकऱ्याने माझ्याकडे तिरस्काराने बघत नकारार्थी मान हलवली. मी त्याच्याकडे पाहिले आणि त्याला म्हणालो की, चेन्नईला ये, मी तुला दाखवतो की, मी कोण आहे. मला खूप राग आला; पण ही गोष्ट माझ्या डोक्यात राहिली. त्या घटनेनंतर मला याची जाणीव झाली की, मी इतरांच्या तालावर नाचत आहे. मला याची जाणीव झाली की, आयुष्यात अनेक गोष्टी करू शकतो; पण मी त्या चित्रपटात दाखवत नाही. मी काही लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होतो. मला पैशाची कमतरता नव्हती किंवा मी अशिक्षितही नव्हतो. मला माझी चूक समजली. त्यानंतर मी अभिनयातून ब्रेक घेण्याचे ठरविले.”

आर. माधवनने जेव्हा अभिनयातून ब्रेक घेतला तेव्हा तो संपूर्ण देश फिरला. आर माधवन म्हणाला, “मला संपूर्ण देश समजून घ्यायचा होता. लोक कोणत्या गोष्टींचे कौतुक करीत आहेत, हे मला जाणून घ्यायचे होते. मी अभिनय करणे थांबवले. मी जाहिरातींचे शूटिंगदेखील करीत नव्हतो. मी दाढी वाढवली, देशभर फिरलो आणि खरंच काय महत्त्वाचे आहे, रिक्षावाले कसे बोलतात, हे समजून घेतले. त्या चार वर्षांत मी जे आत्मसात केले, त्यातून मी आजही शिकत आहे. असे आर. माधवनने म्हटले.

दरम्यान, आर. माधवनची प्रमुख भूमिका असलेला ‘केसरी २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार अनन्या पांडे हे कलाकारही प्रमुख भूमिकांत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याशिवाय आर. माधवन व नयनतारा यांच्या प्रमुख भूमिका असलेला टेस्ट हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ४ एप्रिल २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.