अभिनेता आर माधवन सध्या त्यांच्या ‘हिसाब बराबर’ सिनेमाचे प्रमोशन करत आहे. माधवनने सांगितलं की त्याची मराठमोळी पत्नी सरिताच्या मते तो आर्थिक गोष्टींच्या बाबतीत फार हुशार नाही. स्टारडममुळे मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घेण्याबद्दल त्याने सांगितलं. तसेच खर्चाच्या बाबतीत तो आमिर खानपेक्षा कसा वेगळा आहे याबद्दलही त्याने सांगितले.
जस्ट टू फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत माधवनने त्याच्या वैयक्तिक जीवनातील आर्थिक पैलूंबद्दल खुलासा केला. “माझ्या पत्नीला वाटतं की मी पैशांच्या बाबतीत खूप चुका करतो आणि मी मूर्ख आहे. मला माझे पैसे कसे सांभाळून ठेवायचे हे माहीत नाही. तिला वाटतं की मला कोणी पैसे मागितले की मी लगेच देतो, पण तसं नाही. माझ्याकडे जे पैसे आहेत ते मी खर्च करतो,” असं तो म्हणाला.
मला माझ्या स्टारडममुळे स्वातंत्र्य मिळतं – आर माधवन
माधवन म्हणाला की त्याला स्टारडमचे फायदे माहीत आहेत, पण तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा गोष्टी करण्यावर विश्वास ठेवतो. स्टारडमबद्दल ज्या गोष्टी महत्त्वाच्या समजल्या जातात, त्यासाठी तो स्वतःला बदलत नाही. “मी खर्चांबद्दल विचार करत नाही, पण मी मर्यादित खर्च करतो, त्यामुळे मला मोठी कार किंवा चांगली वस्तू हवी असेल तर ती माझ्या बजेटमध्ये बसत नसेल तर मी ती खरेदी करणार नाही. पण मला माझ्या स्टारडममुळे स्वातंत्र्य मिळतं आणि त्या गोष्टींचा मी आनंद घेतो,” असं माधवनने सांगितलं.
माधवनला विचारण्यात आलं की तो जवळ पैशांचं पाकिट बाळगतो की नाही. कारण त्याचा ‘३ इडियट्स’मधील सह-कलाकार आमिर खान पाकिट जवळ ठेवत नाही. “मी तसा नाही. आमिरचं स्टारडम त्याला तसं करू देतं, त्याला जे काही हवं आहे, ते घेण्यासाठी पैसे देण्यासाठी त्याच्याकडे लोक आहेत. अर्थात, तो त्यांना त्या कामाचं मानधन देतो,” असं माधवन म्हणाला. “मला एकटं फिरायला आवडतं, त्याच्यासारखं लोक सोबत घेऊन फिरायला आवडत नाही. कारण मला ते स्वातंत्र्य आणि लोकांशी संवाद साधण्याची क्षमता हवी आहे,” असं मत माधवनने व्यक्त केलं.
अश्विनी धीर दिग्दर्शित ‘हिसाब बराबर’ या चित्रपटात कीर्ती कोल्हारी, मनु ऋषी, रश्मी देसाई आणि फैसल रशीद यांच्याही भूमिका आहेत.