अभिनेत्री राधिका आपटे(Radhika Apte)ने २००५ मध्ये ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘समांतर’, ‘शोर इन सिटी’, ‘लय भारी’, ‘बदलापूर’, ‘फोबिया’, ‘पॅडमॅन’, ‘रात अकेली हैं’, ‘मेरी ख्रिसमस’ अशा अनेक चित्रपटांत प्रमुख भूमिकेत काम केले आहे. आता मात्र अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.
राधिका आपटेची पुरस्कार सोहळ्याला हजेरी
राधिका आपटेने नुकतीच बाफ्टा पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावली होती. याआधीही सोशल मीडियावर तिने या कार्यक्रमाची झलक दाखवणारे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अभिनेत्रीने या पुरस्कार सोहळ्यातील काही फोटो शेअर करत पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये ती तिच्या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर पोझ देताना दिसत आहे. ‘सिस्टर मिडनाइट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. करण कंधारी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून त्यांनीदेखील बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. अभिनेत्रीने या लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधले आहे.
करण कंधारी यांनी ‘सिस्टर मिडनाईट’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनातून पदार्पण केले आहे. विशेष बाब म्हणजे, ७८ व्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात आऊटस्टँडिग डेब्यूसाठी हा चित्रपट नॉमिनेट झाला आहे. याआधी राधिकाने करण कंधारी यांना नॉमिनेशनसाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करीत लिहिले होते की, बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात ‘सिस्टर मिडनाईट’ला नॉमिनेशन मिळाले आहे, करण कंधारी सरांना यासाठी खूप शुभेच्छा. माझ्या गरोदरपणानंतर पहिल्यांदाच मी काम करत आहे. बाळाच्या जन्मानंतर अगदी दोन महिन्यातच कामाला सुरुवात केली. दोन तासांची झोप घेऊन काम करणे इतक्या चांगल्या टीमशिवाय हे अशक्य होते.
याबरोबरच अभिनेत्रीने सोशल मीडियावर आणखी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या एका हातात वाईनचा ग्लास आणि दुसऱ्या हातात ब्रेस्ट पंप दिसत आहे. हा फोटो शेअर करताना पहिल्यांदाच आई होणं आणि त्याबरोबरच काम करणं अवघड आहे, मात्र चित्रपटाच्या टीममुळे तिला काम करणे शक्य झाल्याचे म्हटले. अशा प्रकारची संवेदनशीलता व काळजी चित्रपटसृष्टीत कमी प्रमाणात पाहायला मिळते, असे म्हणत चित्रपटाच्या टीमचे तिने आभार मानले आहेत.
‘सिस्टर मिडनाईट’ चित्रपटात राधिकाने उमा ही भूमिका साकारली आहे, जी छोट्या गावातील असून बंडखोर आहे. तिचे लग्न झालेले असून ती तिच्या वैवाहिक जीवनात नाखूश आहे. उमा मुंबईत राहत असून ती तिच्या आयुष्यातील एकसारखेपणाला कंटाळली असल्याचे दिसते. उमाला एका अनोळखी व्यक्तीबरोबर तिथे कैद केल्यासारखे वाटते. मात्र, जसा वेळ पुढे जाईल तसे उमा शहरातल्या जीवनशैलीला आपलेसे करते व तिची एक वेगळी ओळख निर्माण करते.