Radhika Apte Pregnancy : बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या तमाम चाहत्यांना नुकतीच गुडन्यूज दिली आहे. लग्नाच्या १२ वर्षांनी अभिनेत्री आई होणार आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलला ‘सिस्टर मिडनाइट’ सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या निमित्ताने उपस्थिती लावली होती. यावेळी राधिका गरोदर असल्याचं पाहिल्यावर अनेकांना सुखद धक्का बसला. या सोहळ्याचे काही फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत. सध्या संपूर्ण कलाविश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
राधिका आपटेने ( Radhika Apte ) २०१२ मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधली होती. आपलं वैयक्तिक आयुष्या राधिकाने कायमच सोशल मीडियापासून दूर ठेवलं. २०११ मध्ये बेनेडिक्ट आणि राधिकाची एकमेकांशी ओळख झाली होती. त्याने दोघेही एकत्र राहिले, पुढे २०१२ मध्ये त्यांनी लग्न केलं.
राधिका आपटे ही हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत काम करणारी तसेच वेब सीरिजच्या माध्यमातून आपला ठसा उमटवारी एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत काही दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह ती ‘कबाली’ या सिनेमात झळकली होती.
राधिका आपटे होणार आई
आता लग्नाच्या १२ वर्षांनी राधिका आई होणार आहे. १६ ऑक्टोबरला पार पडलेल्या लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिस्टर मिडनाइट चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अभिनेत्री गेली होती. यादरम्यानचे फोटो शेअर करत राधिकाने या फोटोंना ‘सिस्टर मिडनाइट यूके प्रीमियर’ असं कॅप्शन दिलं आहे. यात कुठेही तिने गरोदर असल्याचा उल्लेख केला नसला तरीही रेड कार्पेटवर पोज देणाऱ्या राधिकाचा ( Radhika Apte ) बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे.
राधिकाने फिल्म फेस्टिव्हलला ब्लॅक ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस घातला होता. तिचा हा प्रेग्नन्सी लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. राधिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती कतरिना कैफ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती यांच्या मेरी ख्रिसमसमध्ये झळकली होती. या चित्रपटात तिने कॅमिओ केला होता.