बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १३ मे ला परिणीती व राघव यांनी साखरपुडा करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी परिणीती व राघव यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. यावेळी कलाक्षेत्रासह राजकीय विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. आता दोघांचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परिणीती आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लग्नगाठ बांधणार आहेत. राघव आणि परिणीती यांचे लग्न २३ आणि २४ सप्टेंबरला होणार आहे. २२ तारखेपासून पाहुण्यांचे आगमन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम सुरू होतील.
परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी उदयपूरचे सितारा हॉटेल बुक केले आहे. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम लीला पॅलेस आणि उदयविलास हॉटेलमध्ये होणार असून पाहुण्यांची येथे राहण्याची सोय करण्यात येणार आहे. दोन्ही हॉटेल्समध्ये बुकिंग झाले असून, तयारी सुरू झाली आहे. या लग्नात राजकारण आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेक स्टार्स येणार आहेत. उदयपूरमधील घडामोडींबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच G20 ची पहिली बैठक उदयपूरमध्ये झाली. याशिवाय अंबानी कुटुंबाचा विवाह सोहळाही येथे पार पडला. याशिवाय उदयपूरमध्येही अनेक मोठे कार्यक्रम झाले आहेत.
हेही वाचा- “सुरुवातीला मला खूप विचित्र वाटत होतं…”; विकी कौशलचा पत्नी कतरिनाबाबत मोठा खुलासा, म्हणाला
साखरपुड्यापूर्वी बरेच महिने परिणीती व राघवच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चाही रंगल्या. इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी दोघांना एकत्रित पाहिलं गेलं. मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. साखरपुडा करत त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली.