Raha Kapoor : आलिया भट्ट व रणबीर कपूर यांनी जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. बॉलीवूडमधील ‘पॉवर कपल’ म्हणून या जोडप्याकडे पाहिलं जातं. आलियाने नोव्हेंबर २०२२ मध्ये राहाला जन्म दिला. सध्या अभिनेत्रीपेक्षा तिच्या लेकीची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. अल्पावधीतच राहा सर्वांची फेव्हरेट झाली आहे.
आलिया भट्ट व रणबीरच्या लेकीचा ( Raha Kapoor ) जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. गेल्यावर्षी म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये आलियाने ख्रिसमसच्या दिवशी पहिल्यांदाचा राहाचा चेहरा माध्यमांसमोर रिव्हिल केला होता. या दिवशी राहाचे असंख्य फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चिमुकल्या राहाचा गोड अंदाज नेहमीच लक्षवेधी ठरतो. नुकतीच ती आपल्या आईबरोबर रक्षाबंधन साजरा करण्यासाठी पोहोचली आहे.
राहाच्या ( Raha Kapoor ) पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आलिया-रणबीरची गोड लेक राहा सुद्धा आज आपल्या भावंडांबरोबर रक्षाबंधन साजरा करणार आहे. यानिमित्त तिने खास पारंपरिक लूक केला होता.
आलिया भट्ट, तिची लेक राहा ( Raha Kapoor ) अन् सासूबाई नीतू कपूर अशा तिघीजणी एकत्र रक्षाबंधन साजरा करण्यासाठी पोहोचल्या आहेत. सध्या यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आलियाने यावेळी लेकीला कडेवर घेत सासूबरोबर पोज दिल्या. हा व्हिडीओ ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
आलियाने रक्षाबंधन दिवशी पिस्ता रंगाचा ड्रेस घातल्याचं पाहायला मिळत आहे. तर, तिच्या सासूबाई व ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी देखील सूनेसारखा मॅचिंग असा ड्रेस घातला होता. याशिवाय चिमुकली राहा बेबी पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. आलिया अन् राहाच्या पारंपरिक अंदाजाने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नेटकऱ्यांना पुन्हा एकदा राहाचा हा गोड अंदाज भावला आहे. मायलेकींच्या लूकचं कौतुक करण्यात येत असून अनेकांनी “आता राहा सेम आपल्या आईसारखी दिसतेय” असं कमेंट्समध्ये म्हटलं आहे.