पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. चाहत्यांनाही हा व्हिडीओ पाहून मोठा धक्का बसला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राहत फतेह अली खान आपल्याच नोकराला मारहाण करताना दिसत आहेत. ही मारहाण करताना टेबलावर ठेवलेली दारूची बाटली गेली कुठे, अशी विचारणाही ते करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी राहत फतेह अली खान यांच्यावर बरीच टीका केली आहे.
नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर राहत यांना चांगलेच खडेबोल सूनवायला सुरुवात केली. हे पाहताच राहत यांनी एक व्हिडीओ शेअर करत घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. व्हिडीओमध्ये राहत आपल्या घरातील काम करणाऱ्या नोकराला चपलेने मारताना अन् खेचतान दिसत आहेत. ते त्या व्यक्तीच्या डोक्यावर चपलेने मारत दारूच्या बाटलीबद्दल विचारत आहेत.
आणखी वाचा : “प्रादेशिक चित्रपट उत्तम पण…” हिंदी चित्रपटसृष्टीची बाजू घेत अमिताभ बच्चन यांनी केली प्रेक्षकांची कानउघडणी
त्यांचं हे असं वागणं पाहून तो नोकर चांगलाच घाबरला असल्याचं दिसत आहे, पण राहत त्याला मारहाण करतच आहेत. त्याला मारता मारता ते स्वतःदेखील खाली पडले. सोशल मीडियावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रियादेखील यायला सुरुवात झाली आहे. राहत फतेह अली खान यांच्याबार बहिष्कार घातला पाहिजे अशी काही लोकांनी मागणी केली आहे. राहत यांचे हे कृत्य अत्यंत अमानुष असल्याचंही कित्येकांनी सांगितलं आहे.
जेव्हा सोशल मीडियावर लोक आपल्यावर टीका करत आहेत हे जेव्हा राहत यांच्या ध्यानात आलं तेव्हा त्याच नोकराबरोबर राहत फतेह अली खान यांनी नवा व्हिडीओ बनवून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राहत यांनी त्याची माफी मागितली असून तो त्यांचा शिष्य असल्याचंही स्पष्ट केलं. गुरु आणि शिष्यात असंच नातं असतं. चांगलं काम केलं तर शाबासकी आणि चूक झाली तर ओरडा मिळणारच असं राहत यांनी त्या व्हिडीओमध्ये सांगताना स्पष्ट केलं आहे.
याच व्हीडीओमध्ये त्या नोकरानेही स्पष्टीकरण दिलं आहे. दारूच्या बाटलीमुळे नव्हे तर पवित्र पाण्याच्या एका बाटलीवरुन वाद उद्भवला असल्याचं त्याने कबूल केलं आहे. राहत हे त्यांच्या शिष्यांवर प्रचंड प्रेम करतात, त्यांना उगाच बदनाम करण्यासाठी या गोष्टी पसरवल्या जात असल्याचंही स्पष्टीकरण त्या नोकराने दिलं. राहत फतेह अली खान हे भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत अन् हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी बरीच गाणी गायली आहेत. आता मात्र या व्हिडीओमुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून जबरदस्त टीका होताना दिसत आहे.