Tumbbad re-release Box Office collection Day 3 : सध्या सगळीकडे ‘तुंबाड’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट सहा वर्षांनी थिएटर्समध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. तेव्हा फ्लॉप ठरलेल्या या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत चांगली कमाई केली आहे.
‘तुंबाड’ हा चित्रपट १२ ऑक्टोबर २०१८ रोजी पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. सहा वर्षांनी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाकडे तेव्हा प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती, पण री-रिलीजनंतर मात्र चित्रपटाने चांगले कलेक्शन केले आहे. मराठमोळे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा ‘तुंबाड’ चित्रपट पुन्हा रिलीज झाल्यावर प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे.
‘तुंबाड’ सिनेमाने तीन दिवसांत किती कमाई केली?
अभिनेता सोहम शाहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.६० कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याने पहिल्या दिवशी फक्त ६५ लाख रुपये कमावले होते. त्या तुलनेत आता सिनेमाची कमाई खूप चांगली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने २.६० कोटी रुपये कमावले होते, त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ झाली. रविवारी चित्रपटाने ३.२५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता ७.५० कोटी रुपये झाले आहे.
रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”
या सिनेमाने २०१८ मध्ये जगभरात १२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या तुलनेत आता चित्रपटाने तीन दिवसांत साडेसात कोटी कमावले आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता तो लवकरच मूळ कलेक्शनला मागे टाकेल, असं चित्र दिसत आहे.
मुख्य म्हणजे ‘तुंबाड’ हा प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, तरीही या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. राही अनिल बर्वे यांनी प्रचंड मेहनतीने तयार केलेल्या या चित्रपटाला सहा वर्षांपूर्वी प्रेक्षक मिळाले नव्हते. त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी १५ कोटी रुपये खर्च केले होते.