राज बब्बर त्यांची सहकलाकार अभिनेत्री स्मिता पाटीलच्या प्रेमात पडले तेव्हा ते आधीच विवाहित होते. त्यांना पत्नी नादिरा बब्बरपासून दोन मुलं होती. राज यांनी स्मिता पाटील यांच्याशी लग्न केलं होतं. त्या काळात स्मिता यांनी सावत्र मुलं जुही व तिचा धाकटा भाऊ आर्य यांच्याशी जुळवून घेण्याचे कसे प्रयत्न केले, याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज बब्बर यांची मुलगी जुही हिने खुलासा केला. तिने तिचा सावत्र भाऊ, स्मिता आणि राज यांचा मुलगा प्रतीकला मनापासून कसं स्वीकारलं हेदेखील सांगितलं.
लेहरेन रेट्रोशी बोलताना जूही म्हणाली, “माझ्या वडिलांनी स्मिता पाटीलबरोबरच्या त्यांच्या लग्नाबद्दल मला सांगितलं तेव्हा मी सात वर्षांची होते. आणि त्यामुळेच माझ्या स्मिताजींबद्दलच्या आठवणी खूप वेगळ्या आहेत. त्यांनी माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. मला वाटतं त्या असा विचार करायच्या की त्यांच्यासाठी सर्वात खास असलेल्या व्यक्तीची आम्ही मुलं आहोत आणि म्हणूनच आम्हीही त्यांच्यासाठी खास आहोत. त्या आमच्यावर खूप प्रेम करायच्या, त्या कुठेही फिरायला गेल्या की नेहमी आमच्यासाठी भेटवस्तू आणायच्या. तसेच आम्हाला जे खायला आवडतं तेच जेवण घरी बनेल, याची त्या खात्री करायच्या. या आठवणी थोड्या आहेत, मात्र छान आहेत; पण दुर्दैवाने त्यांच्याबद्दल फारशा आठवणी नाहीत.”
आईला होत होत त्रास – जुही
स्मिता व राज यांच्या नात्याचा तिची आई नादिरावर झालेला परिणामही जुहीने बोलून दाखवला. स्मिता आमच्यात मिसळायचा प्रयत्न करत होत्या, पण तरीही त्यामुळे तिची आई दुःखी असल्याचं स्पष्ट जाणवायचं, असं जुहीने सांगितलं. “लहानपणी, मला माहीत होतं की ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर माझ्या वडिलांना राहायचं आहे आणि त्यांना तिला आपली पत्नी बनवायचं आहे. मी स्मिता यांना माझ्या आणि माझ्या लहान भावासाठी बरेच प्रयत्न करताना पाहत होतो. पण यामुळे माझ्या आईला त्रास होत होता, माझी आई या प्रयत्नांमुळे खूश नव्हती, हे मला दिसत होतं. आंटी (स्मिता) माझ्याबरोबर खूप चांगल्या वागायच्या, पण मी घरी गेल्यावर हे माझ्या आईला सांगू नये, असं मला लक्षात आलं होतं,” असं जुही म्हणाली.
हेही वाचा : “Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
सावत्र भाऊ प्रतीक बब्बरबद्दल म्हणाली…
सावत्र भाऊ प्रतीकबरोबरच्या बाँडिंगबद्दल जुहीने सांगितलं. त्याला कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारण्यात कधीही संकोच वाटला नाही, असं जुही म्हणाली. “स्वीकारणे हा शब्द योग्य नाही, कारण प्रतीक माझा भाऊ आहे. त्यामुळे कोणताही संकोच नव्हता. तो माझा भाऊ आहे आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही,” असं जुहीने स्पष्ट केलं.
स्मिता पाटील यांचे १९८६ मध्ये प्रसूतीनंतरच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. प्रतीकच्या जन्मानंतर १५ दिवसांनी त्यांचा अवघ्या ३१ व्या वर्षी मृत्यू झाला होता.