काही बॉलीवूड कलाकारांचे आयुष्य चित्रपटांच्या कथेसारखे वाटते. अशाच काही कलाकारांच्या जीवनावर आपण नजर टाकल्यास लक्षात येईल की असे अनेक कलाकार आहेत, जे एकापेक्षा जास्त वेळा प्रेमात पडले. त्यांच्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांचे लग्न झाले होते आणि विवाहित असूनही ते दुसऱ्याच्या प्रेमात पडलो. प्रेमात पडल्यावर ते पत्नीपासून वेगळे झाले, पण दुसरं लग्न किंवा नातं यशस्वी झालं नाही तर ते परत आपल्या पहिल्या पत्नीकडे आले. अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊयात.
दिलीप कुमार सायरा बानो
सायरा बानो या दिलीप कुमार यांच्या निम्म्या वयाच्या होत्या. ज्या वर्षी दिलीप कुमार यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले त्या वर्षी सायरा बानोंचा जन्म झाला होता. लहानपणापासून दिलीप कुमार यांच्या फॅन असलेल्या सायरा यांनी १९६६ मध्ये दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या वेळी दिलीप कुमार ४४ आणि सायरा फक्त २२ वर्षांच्या होत्या. लग्नाच्या ६ वर्षानंतर सायरा गरोदर राहिल्या पण त्यांचा गर्भपात झाला. या अपघातानंतर दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी पालक न होण्याचा निर्णय घेतला.
१५ वर्षांच्या सहजीवनानंतर एक वेळ अशी आली की दिलीप कुमार यांचा जीव आसमां रहमानवर जडला. विवाहीत असूनही १९८२ मध्ये त्यांनी आसमांशी लग्न केले. मात्र, हे लग्न वर्षभर टिकले आणि त्यांचा घटस्फोट जाला. घटस्फोटानंतर दिलीप यांच्या मनात पुन्हा सायरासाठी प्रेम फुलले. नंतर ते पुन्हा एकत्र आले आणि शेवटपर्यंत दिलीप कुमार सायरा बानोसोबत राहिले.
राज बब्बर आणि नादिरा
राज बब्बर हे एकेकाळी बॉलीवूडचे मोठे सुपरस्टार होते. व्यावसायिक जीवनात यशाच्या शिखरावर असलेले राज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिले होते. त्यांनी १९७५ मध्ये थिएटर कलाकार आणि अभिनेत्री नादिराशी लग्न केले. नादिरा आणि राज यांना दोन मुलं होती. लग्नाच्या सात वर्षांनी स्मिता पाटील यांची राज बब्बर यांच्या आयुष्यात एंट्री झाली. १९८२ मध्ये राज आणि स्मिता पहिल्यांदा ‘भीगी पलकें’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. राज पहिल्याच भेटीत स्मिताच्या प्रेमात पडले. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागली. त्यांच्या अफेअरची बातमी नादिरापर्यंतही पोहोचली. एका मुलाखतीत राज बब्बर यांनी स्वत: कबूल केलं होतं की ते स्मिताच्या प्रेमात आहेत.
राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी १९८६ मध्ये लग्न केलं, वर्षभरातच स्मितांनी राज यांचा मुलगा प्रतीकला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यानंतर स्मिता पाटील यांचे निधन झाले. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज पुन्हा एकदा नादिराकडे परतले. नादिरानेही राज यांना स्वीकारलं.
अन्नू कपूर आणि अनुपमा
१९९२ मध्ये अन्नू कपूर यांनी अमेरिकेत राहणाऱ्या अनुपमाशी लग्न केले. अनुपमा अन्नूपेक्षा १३ वर्षांनी लहान होती. लग्नानंतर दोघांची भांडणं होऊ लागली. रोजच्या भांडणांना कंटाळून अन्नू कपूर आणि अनुपमा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अन्नू कपूर यांच्या आयुष्यात अरुणिता मुखर्जी आली. दोघांनी १९९५ मध्ये लग्न केले. पण लग्नानंतर लगेचच अन्नू कपूर यांना पहिल्या पत्नीची आठवण येऊ लागली. अरुणिताशी लग्न करूनही ते अनुपमाशी बोलत होते. अनेकवेळा ते अरुणिताला न सांगता पहिल्या पत्नीला भेटायला जात असे. अरुणिताला जेव्हा हे कळले तेव्हा तिने घटस्फोट मागितला. घटस्फोटानंतर अन्नू कपूर यांनी पुन्हा पहिली पत्नी अनुपमाशी लग्न केलं. आता ते एकत्र राहतात.
३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”
इम्तियाज अली आणि प्रीती
इम्तियाज अली बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. ‘जब वी मेट’, ‘हायवे’, ‘तमाशा’ आणि ‘लव्ह आज कल’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या इम्तियाजची प्रेमकथाही त्याच्या चित्रपटांप्रमाणेच थोडी वेगळी आहे. त्याने १९९५ मध्ये गर्लफ्रेंड प्रीतीशी लग्न केले. दोघांनाही एक मुलगी आहे, तिचे नाव इदा अली आहे. पण २०१२ मध्ये इम्तियाज व प्रीतीने विभक्त व्हायचा निर्णय घेतला. दोघांचा घटस्फोट झाला आणि प्रीतीला मुलीचा ताबा मिळाला.
प्रीतीपासून वेगळे झाल्यानंतर इम्तियाजचे नाव ऑस्ट्रेलियन शेफशी जोडले गेले. इम्तियाज त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचंही म्हटलं गेलं. अशातच २०२० मध्ये करोनामुळे लॉकडाऊन लागलं. यावेळी तो मुलीसोबत राहण्यासाठी पत्नी प्रीतीच्या घरी गेला. तेव्हापासून आजपर्यंत प्रीती आणि इम्तियाज एकत्र राहत आहेत.
अमित टंडन व रूबी
अमित टंडन हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. अमितने २००७ मध्ये रुबी नावाच्या मुलीशी लग्न केलं. लग्नाची काही वर्षे चांगली गेली पण नंतर दोघांचं नातं बिघडलं. घटस्फोट न घेता दोघेही वेगळे राहू लागले. वेगळे राहूनही त्यांनी आपलं नातं तोडलं नाही. आता लग्नाच्या जवळपास सोळा वर्षानंतर अमित टंडनने रुबीसोबतच्या प्रेमाला आणखी एक संधी दिली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याने पुन्हा आपल्या पत्नीशी लग्न केलं. या लग्नात त्यांची मुलगीही हजर होती.