Nadira Babbar Smita Patil : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व राज बब्बर यांच्या प्रेमकहाणीबद्दल नेहमीच चर्चा होते. राज व स्मिता यांचा मुलगा प्रतीकने वडिलांचं नाव हटवलं आहे. त्याने स्वतःचं नाव प्रतीक स्मिता पाटील असं केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज व स्मिता यांच्याबद्दलचे जुने किस्से चर्चेत आहेत. राज बब्बर यांच्या पहिल्या पत्नी नादिरा यांनी एकदा स्मिता पाटील यांच्याबद्दल विधान केलं होतं.

राज बब्बर यांनी नादिराशी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. त्यांना जूही व आर्या ही दोन अपत्ये झाली. जबाबदाऱ्या वाढल्याने कामाची गरज होती, त्यामुळे जास्त पैसे कमवायला राज बब्बर मुंबईला आले. मुंबईत त्यांना काम मिळालं. १९८२ मध्ये राज व स्मिता यांची पहिली भेट ‘भीगी पलकें’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. नंतर दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं होतं. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता राज यांनी स्मिताशी लग्न केलं होतं. पण स्मिता व राज यांची सोबत फार कमी काळासाठी होती.

स्मिता यांच्या अकाली निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती. अवघ्या ३१ व्या वर्षी १३ डिसेंबर १९८६ रोजी बाळंतपणातील गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं होतं. त्यावेळी प्रतीक फक्त दोन आठवड्यांचा होता. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर यांची पत्नी नादिरा त्यांच्या घरी गेल्या होत्या. “मला जुने मुद्दे उकरून काढायचे नाहीत. प्रतीकच्या आजी (विद्याताई पाटील) यांचं वय झालं आहे. मला कोणालाही दुखवायचं नाही,” असं नादिरा स्मिता पाटीलबद्दल विचारल्यावर म्हणाल्या होत्या.

स्मिता पाटील यांच्या घरी गेल्या होत्या नादिरा

“मी तिच्या घरी गेले होते, त्यामुळे माझी निर्भत्सना करण्यात आली. मला तिच्या आईसाठी, कुटुंबासाठी, तिच्या मुलासाठी खूप वाईट वाटलं होतं. तिची (स्मिता) खूप स्वप्ने होती, तिच्या आंकाक्षा होत्या. ती स्वप्ने ती जगू शकली नाही हे दु:खद आहे. तिच्या निधनाचे दु:ख खूप मोठे होते. यामुळे सर्वांना धक्का बसला, आम्ही व्यथित झालो होतो. प्रतीक, तिचे आई-वडील आणि कुठेतरी मीही… तो खूप वाईट काळ होता,” असं नादिरा म्हणाल्या होत्या. फिल्मफेअरने यासंदर्भात वृत्त दिलंय.

nadira babbar on smita patil
स्मिता पाटील राज बब्बर (फोटो – संग्रहित)

“मी सर्वांना माफ केलंय, माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट भावना नाही. आयुष्याने मला जे काही दिलंय, त्याबद्दल मला कोणतीच तक्रार नाही. तुमच्याबरोबर असलेली कोणती व्यक्ती तुमच्याबरोबर केव्हा असेल, नसेल हे सांगता येत नाही,” असं नादिरा यांनी म्हटलं होतं.

तेव्हा नादिरा प्रतीकबद्दल व्यक्त झाल्या होत्या. “प्रतीक हा खूप चांगला मुलगा आहे. तो त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करतो. माझ्यावरही प्रेम करतो. तो कामात अजून स्थिरावला नाही,” असं नादिरा म्हणाल्या होत्या.