राज कपूर हे देशातील सर्वात दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते. राज यांचे सुपूत्र रणधीर कपूर यांनी १९७१ मध्ये बबिताशी लग्न केलं आणि त्यांना १९७४ मध्ये मुलगी झाली. ही मुलगी म्हणजे करिश्मा कपूर होय. करिश्मा ही राज यांची पहिली नात होती. पण करिश्माचा जन्म होण्यापूर्वी, राज कपूर यांनी एक अनोखी अट ठेवली होती आणि तसं असेल तरच नवजात बाळाला भेटायला रुग्णालयात जाईन, नाहीतर जाणार नाही, असं ते म्हणाले होते.
राज यांची मुलगी रितू नंदा यांनी लिहिलेल्या राज कपूर: द वन अँड ओन्ली शोमॅन या पुस्तकात बबिता यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. बबिता यांचे वडील हरी शिवदासानी आणि राज मित्र होते, ते एकत्र टेनिस खेळायचे. तेव्हा बऱ्याचदा राज बबिता यांच्या घरी जायचे. टेनिस खेळल्यावर तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे, असं तिला विचारायचे. बबिता यांनी पुस्तकात लिहिलंय, “मला आठवतं लहानपणी मी त्यांच्या मांडीवर बसायचे आणि ते मला विचारायचे की मोठी झाल्यावर मला काय व्हायचं आहे. मी म्हणायचे की मला अभिनेत्री व्हायचं आहे. ते मला नेहमीच प्रोत्साहन द्यायचे आणि एक दिवस मी नक्कीच मोठी स्टार होईन, असं म्हणायचे.”
बबिता नंतर राज कपूर यांच्या सून झाल्या. करिश्मा जिला प्रेमाने सगळे लोलो म्हणतात तिचा जन्म झाला तेव्हाचा एक किस्सा बबिता यांनी सांगितला आहे. “ज्या दिवशी लोलोचा जन्म झाला, तेव्हा माझे सासरे वगळता संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होतं. पण नवजात बाळाचे डोळे निळे असतील तरच मी रुग्णालयात येईन, असं माझे सासरे म्हणाले होते. नशीब, लोलोचे डोळे माझ्या सासऱ्यांसारखेच निळे होते,” असं बबिता यांनी लिहिलंय.
याच पुस्तकात करिश्माने तिच्या अभिनयाच्या आवडीबद्दल आजोबांशी बोलल्याची आठवण सांगितली. ती म्हणाली. “लहानपणी मी नेहमी म्हणायचे की मला चित्रपटात काम करायचं आहे, मला अभिनेत्री व्हायचं आहे. माझे आजोबा एकदा मला म्हणाले होते, अभिनेत्री होणं इतकं सोपं नाही, तुला अभिनय करायचा असेल तर खूप मेहनत करावी लागेल”. करिश्मा व करीना या दोघीही आजोबा राज कपूर यांच्या खूप जवळ होत्या.