मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांची नावे एकमेकांशी जोडली जातात. काही कलाकार एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये असतात, तर अनेकदा फक्त त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसते, काही जोडपी मात्र कायम चर्चेत असतात. अशा चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी राजेश खन्ना(Rajesh Khanna) व अंजू महेंद्रू हे आहेत. असे म्हटले जाते की, अंजू महेंद्रू अशा एकमेव स्त्री होत्या, ज्यांनी राजेश खन्ना यांच्या अहंकाराला कधी महत्त्व दिले नाही आणि त्यामुळे त्यांचे नाते संपले. ज्या काळात तरुणी राजेश खन्नांसाठी रक्ताने पत्रे लिहित, त्या काळात अंजू महेंद्रू मात्र त्यांना त्यांच्यासारखेच मानत. १९६६ ते १९७२ या काळात ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्याचा शेवट मात्र दु:खद झाला. याला अनेक कारणे आहेत. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसारखेच त्यांच्या नात्यात आव्हाने, अफवा, अफेअर, ईर्षा, अशा अनेक गोष्टी होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजेश खन्ना व अंजू महेंद्रू हे एका नाटकादरम्यान भेटले होते. अंजू यांनी वयाच्या १३ व्या वर्षी मॉडल म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांच्यातील नाते त्यांनी कधीही लपवले नाही. राजेश खन्ना एका रात्रीत लोकप्रिय झाले; अंजू मात्र संघर्ष करीत होत्या. त्यांना छोट्या छोट्या भूमिका मिळत असत. राजेश खन्ना यांनी आशीर्वाद हे घर खरेदी केले होते आणि ते घर अंजू सांभाळायच्या. अनेक जण असे म्हणतात की, राजेश खन्ना यांनी ते घर त्यांना भेट म्हणून दिले होते. प्रत्येक पार्टी व प्रत्येक कार्यक्रम अंजू यांच्या देखरेखीखाली पार पडत असे. एका काळानंतर राजेश खन्ना त्यांच्या गर्लफ्रेंडवर अधिकार सांगू लागले. अंजू यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरच्या ते विरोधात होते. त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की, अंजू महेंद्रू यांना काही काळ शूटिंग केल्यानंतर काही प्रोजेक्टमधून बाहेर पडावे लागले.

तो माझे आयुष्य नियंत्रित…

१९७३ ला अंजू महेंद्रू यांनी ‘स्टारडस्ट’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत राजेश खन्ना यांच्याबद्दल बोलताना अंजू महेंद्रू यांनी म्हटलेले, “मला गमावण्याची राजेशला भीती वाटत होती. तो माझ्यावर जास्त अधिकार दाखवत असे. त्याला वाटायचे की, तो माझे आयुष्य नियंत्रित करू शकतो. तो इतका संशयी बनला होता की, तो सतत माझ्या घरी फोन करून माझ्याबद्दल, मी कुठे आहे, याबद्दल विचारत असे. मी घरी राहून त्याची वाट बघावी, असे त्याला वाटत असे.”

‘स्क्रीन’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अंजू यांनी म्हटले होते, “राजेश खन्ना हे रूढीवादी होते; पण तरीही मॉडर्न असणाऱ्या मुलींकडे तो आकर्षित होत असे. मला माहीत आहे की, तो विरोधाभासी आहे; पण राजेश खन्ना त्यावेळी असा होता. आमच्या रिलेशिनशिपमध्ये गोंधळाची स्थिती होती. जर मी स्कर्ट घातलेला असेल, तर तो मला म्हणे की साडी का नेसली नाहीस? जर मी साडी नेसली असेल, तर म्हणत असे की, भारतीय महिलांसारखा लूक करण्याचा का प्रयत्न केला आहेस?

मुमताज यांनी ‘रेडिफ’ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते, “राजेश खन्ना यांचे नाव मोठे होते. माझा बंगला त्यांच्या बंगल्याजवळच होता. मोठमोठे निर्माते व दिग्दर्शक त्यांचे चमचे असल्यासारखे वागत असल्याचे मी पाहिले आहे. त्यांची गर्लफ्रेंड अंजू महेंद्रू ही रात्रभर पार्टी होस्ट करत असे. पहाटे ३ पर्यंत ती दारू व खाणे लोकांना देत असे”

ज्यावेळी अंजू महेंद्रू व राजेश खन्ना यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ लागला. त्यावेळी राजेश खन्ना हे मुमताज व शर्मिला टागोर या सहअभिनेत्रींबरोबर डेटिंग करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळेदेखील अंजू अस्वस्थ झाल्या होत्या.

“या सगळ्यामुळे माझीही चिडचिड होत होती”

१९७३ ला ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत अंजू यांनी म्हटले, “राजेश खन्ना यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सलग फ्लॉप ठरल्यानंतर त्यांच्याबरोबर राहणे कठीण झाले होते. त्यांना लगेच राग येत असे. ते कायम तणावात राहत असत आणि त्यामुळे मीही तणावात राहत असे. या सगळ्यामुळे माझीही चिडचिड होत होती. मी त्यांना समजावून सांगितले की, एका कलाकाराच्या आयुष्यात असे चढ-उतार येणे साहजिक आहे. त्यांना असे वाटायचे की, मी फक्त त्यांच्याकडे लक्ष द्यावे, त्यांचे लाड करावेत. पण, सतत हेच करत राहणे माझ्यासाठी शक्य नव्हते.”

याच मुलाखतीत राजेश खन्ना यांनी म्हटले होते, “मी मान्य करतो की, मी कठीण काळातून जात होतो. माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत होते. त्यावेळी मला असे वाटत होते की, त्या कठीण काळात अंजूने माझी साथ द्यावी. पण, जेव्हा मला खूप गरज होती, त्यावेळी ती कुठेही नव्हती. तिने स्वत: कधीही माझ्याबद्दल प्रेम व्यक्त केले नाही. मीच नेहमी प्रेम व्यक्त करत असे.”

१९७१ ला राजेश खन्नांनी अंजू यांना लग्नाची मागणी घातली होती. मात्र, त्यावेळी करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते म्हणून अंजू यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आणखी समस्या निर्माण झाल्या. याचदरम्यान, वेस्ट इंडिजचा फेमस क्रिकेटर गॅरी सोबर्सने अंजू यांना प्रपोज केले आणि ती अंगठी त्यांनी स्वीकारली. एका मुलाखतीत त्याबाबत बोलताना अंजू यांनी म्हटलेले की, जेव्हा त्या गॅरीला भेटल्या त्यावेळी त्या खूप लहान होत्या. गॅरीबद्दल त्यांना आकर्षण वाटत होते; मात्र त्यांचे त्यांच्यावर प्रेम नव्हते, याची जाणीव त्यांना लवकरच झाली, असे अंजू यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी गॅरींबरोबरचा साखरपुडा मोडला.

राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांच्या नात्याच्या चर्चा ऐकल्यानंतर अंजू यांनी राजेश खन्नांना त्याबद्दल विचारले होते. त्यावर त्यांनी आम्ही फक्त मित्र आहोत, असे सांगितले होते.

त्यावेळी डिंपल कपाडिया व अंजू महेंद्रू समोरासमोर…

एकदा राजेश खन्ना यांनी मोठी पार्टी ठेवली होती. त्या पार्टीसाठी अंजू यांनी संपू्र्ण बॉलीवू़ड इंडस्ट्रीला बोलावले; पण डिंपल कपाडियांना बोलावले नाही. राजेश खन्नांना हे समजताच त्यांनी डिंपल यांची माफी मागत त्यांना पार्टीसाठी आमंत्रित केले. त्यावेळी डिंपल कपाडिया व अंजू महेंद्रू समोरासमोर आल्या होत्या. या पार्टीत डिंपल कपाडिया यांनी अंजू यांना उपहासात्मकरीत्या विचारलेले की, मी येऊ शकते का? त्यावर अंजू यांनी चिडून म्हटलेले की, जर तुला आमंत्रण असेल, तर ये; नाही तर परत जा. ही गोष्ट राजेश खन्ना यांना समजल्यानंतर त्यांना अंजू यांचा राग आल्याचे त्यांनी म्हटले होते.. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितल्यानुसार, अंजू यांनी याआधीही अनेकदा असे केले होते. अंजू व तिच्या परिवारामुळे मी माझे अनेक चांगले मित्र गमावले, असे राजेश खन्ना यांनी म्हटले होते.

राजेश खन्ना यांनी या पार्टीनंतरच डिंपल कपाडिया यांच्या घरी जात त्यांना प्रपोज केले आणि ते खंडाळ्याला गेले. अंजू यांना ही गोष्ट समजली. राजेश खन्ना यांनी खंडाळ्याच्या सहलीनंतर अंजूला त्यांच्यातील नाते संपुष्टात आल्याचे सांगण्याचे ठरविले होते. ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश खन्ना यांनी म्हटले होते, “जेव्हा मी परत आलो त्यावेळी माझ्या ड्रायव्हरने मला सांगितले की, अंजूने माझ्यासाठी मेसेज दिला आहे. तिला फोन करण्यापासून व तिला भेटण्यापासून सक्त मनाई केली होती. जर तसे केले, तर माझ्या घरातून हाकलून देईन, अशी सक्त ताकीद तिने दिली होती. त्यामुळे राजेश खन्नांना वाईट वाटले. त्यानंतर हे नाते संपुष्टात आले.

हेही वाचा: बॉलीवूड स्टार्सच्या बॉडीगार्ड्सचा पगार किती असतो? आलिया भट्टसाठी काम करणाऱ्या युसूफने सांगितले आकडे, म्हणाला…

राजेश खन्ना व अंजू यांचे ब्रेकअप झाल्यानंतर डिंपल कपाडिया व राजेश खन्ना यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर राजेश खन्ना व अंजू १७ वर्षे एकमेकांशी बोलले नाहीत. दरम्यान, १९८२ मध्ये राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांचा घटस्फोट झाला. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांत अंजू यांनी त्यांची काळजी घेतली. तसेच डिंपल कपाडिया यांच्या कठीण काळात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajesh khanna and anju mahendru tragic love story 7 years of live in relationship rumours of affairs with co actresses and marriage to dimple kapadia nsp