Rajesh Khanna : १९८३ सालच्या ‘अवतार’ या चित्रपटातून राजेश खन्ना यांनी बॉलीवूडमध्ये दमदार पुरागमन केले. ‘अवतार’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला. जवळपास दशकभराच्या अपयशानंतर राजेश खन्ना यांनी एक मोठा हिट दिला. त्यानंतर आलेले त्यांचे ‘सौतन’ आणि ‘अगर तुम ना होते’ हे चित्रपटही यशस्वी ठरले. या चित्रपटांनी राजेश खन्ना हे सुपरस्टार आहेत हे पुन्हा सिद्ध केले होते. मोहन कुमार दिग्दर्शित ‘अवतार’मध्ये राजेश खन्ना यांच्याबरोबर शबाना आझमी मुख्य भूमिकेत होत्या. आनंद बक्षी यांनी लिहिलेली या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली, परंतु ‘चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात असून वैष्णोदेवीच्या यात्रेचा प्रवास करणाऱ्या भाविकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
अलीकडेच ‘रेडिओ नशा ऑफिशियल’ला दिलेल्या एका मुलाखतीत शबाना आझमी यांनी ‘चलो बुलावा आया है’ या गाण्याच्या शूटिंग दरम्यानच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्या म्हणाल्या, ‘चलो बुलावा आया है’ गाण्यासाठी वैष्णोदेवीच्या भागात शूटिंग करणे खूप आव्हानात्मक होते. त्या काळात हेलिकॉप्टर सेवा नव्हती. आम्हाला पायी चालत मंदिरापर्यंत पोहोचावे लागले. वाटेत शौचालयही नव्हती. परिस्थिती अत्यंत कठीण होती.”
त्या पुढे म्हणाल्या, “तुम्ही कल्पना करू शकता का ?, राजेश खन्ना, जे त्या काळात एक मोठे सुपरस्टार होते, ते डालड्याच्या डब्यांसह रांगेत उभे होते. तेव्हा तिथे खूप थंडी होती. आम्ही धर्मशाळांमध्ये जमिनीवर झोपायचो. आम्हाला १२ ब्लँकेट्सच्या गाद्यांवर झोपावे लागायचे. त्यापैकी ६ ब्लँकेट्स अंगावर घेतल्यावरही थंडी कमी होत नव्हती. त्या वेळी राजेश खन्ना सुपरस्टार होते तरीही त्यांनी त्याचा कुठलाही आव न आणता आमच्याबरोबर प्रतिकूल परिस्थितीतही शूटिंग पूर्ण केलं. आम्ही सर्वांनी एखाद्या संघासारखं मिळून एका ध्येयाने काम केलं.”
शबाना आझमी यांनी याच मुलाखतीत त्यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर घडलेली एक घटना सांगितली. त्या म्हणाल्या, “राजेश आणि मी चांगले मित्र होतो. एकदा आम्ही माध्यमांशी संवाद साधत होतो. तेव्हा ते आले, आणि आम्ही पाहिलं की त्यांच्या टाचेला पट्टी बांधली होती, आणि राजेश तेव्हा लंगडत चालत होते. गर्दीतल्या एका पत्रकाराने लगेच त्यांना विचारलं, ‘तुमच्या पायाला काय झालं?’ त्यांनी पटकन उत्तर दिलं, ‘काल मी घोडेस्वारी करत होतो. घोड्यावरून पडलो.”
शबाना आझमी पुढे म्हणाल्या, “हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं, ‘पण मी दिवसभर तुमच्याबरोबर होते, तुम्ही घोडेस्वारी कधी केली? ” हे ऐकून त्यांनी मला टेबलाखाली लाथ मारली आणि शांत राहण्याचा इशारा केला. त्यांनी मला सांगितलं, ‘मी लुंगीत अडकलो आणि पडलो, हे पत्रकारांना कसं सांगू? म्हणून त्यांना घोडेस्वारी करताना पडलोय! असं सांगितलं. मला माझा क्षण जगू दे, तुला काय प्रॉब्लेम आहे?’ मी खूप हसले.” असे शबाना आझमी म्हणाल्या. शबाना आझमी, यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर सात चित्रपटांत काम केले आहे.