Rajesh Khanna : राजेश खन्ना हे हिंदी चित्रपटसृष्टीतले पहिले सुपस्टार म्हणून ओळखले गेले. १९७३ मध्ये डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांचं लग्न झालं. मात्र साधारण दहा वर्षांच्या कालावधीतच दोघंही वेगळे झाले. त्यानंतर राजेश खन्नांची अखेर येईपर्यंत हे दोघं कधीही एकत्र आले नाहीत. असं असलं तरीही दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला नव्हता. २००४ मध्ये राजेश खन्ना अनिता अडवाणीसह राहू लागले. अनिता अडवाणी या २०१२ पर्यंत म्हणजेच राजेश खन्नांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्याबरोबर होत्या. मी राजेश खन्नांची गर्लफ्रेंड होते असा दावा करणाऱ्या अनिता अडवाणींनी राजेश खन्ना कधीकधी मला मारहाण करत असत असा दावा आता केला आहे.
काय म्हटलं आहे अनिता अडवाणींनी?
अवंती फिल्मने घेतलेल्या मुलाखतीत अनिता अडवाणी म्हणाल्या, “राजेश खन्ना तसे शांत स्वभावाचे होते. ते मुळीच हिंसक नव्हते. मात्र कधी कधी मारहाण करायचे मी पण त्यांना प्रत्युत्तरादाखल मारहाण करायचे. ते मला सांगायचे की माझ्या नखांचा त्यांना त्रास होतो. राजेश यांनी मला बालाजीच्या समोर एक कडं दिलं होतं. आम्ही एकमेकांशी नातं ठेवून होतो पण लग्न केलं नव्हतं. २८ वर्षांपूर्वी मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा राजेश एकटे पडले होते. त्यांच्याबरोबर कुणीही नव्हतं.” असंही अनिता अडवाणी यांनी सांगितलं. Screen ने वृत्त दिलं आहे.
डिंपल आणि राजेश खन्ना यांच्याबाबत काय म्हणाल्या अनिता अडवाणी?
याच मुलाखतीत डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांच्या नात्याबाबतही अनिता अडवाणींनी भाष्य केलं. डिंपल आणि राजेश खन्ना यांनी एकमेकांना घटस्फोट दिला नाही. पण ते एकमेकांपासून वेगळे झाले होते. मला त्यांच्या नात्याबाबत काहीही बोलायचं नाही. त्यांचं आयुष्य हे त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आहे. त्यांना हे कळत होतं की काय करायला हवं आणि काय नाही. असंही अनिता म्हणाल्या.

अनिता अडवाणी २०१३ च्या बिग बॉसमध्ये
राजेश खन्ना यांचा मृत्यू २०१२ मध्ये झाला. त्यानंतर बिग बॉस हिंदीच्या सातव्या पर्वात अनिता अडवाणींचा सहभाग होता. त्यावेळी त्यांनी असा आरोप केला होता की राजेश खन्ना हे मद्यधुंद अवस्थेत त्यांना मारहाण करत. तरीही राजेश खन्ना स्वभावाने चांगले होते. त्यांच्यासह राहणं काही कठीण बाब नव्हती. २०१३ मध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता १२ वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी याच प्रकारचं विधान केलं आहे.