अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले. मात्र, एक काळ असा होता की, त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यांना व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागला होता. एबीसीएल या त्यांच्या कंपनीने १९९९ मध्ये दिवाळखोरी जाहीर केली होती. १९९९ लाच बिग बींचा सूर्यवंशम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. त्यांचा हा चित्रपट खूप गाजला; पण त्याआधी म्हणजे १९९४ ते १९९९ या काळात त्यांनी फक्त चार चित्रपटांत काम केले होते. मृत्युदाता, मेजर साब, बडे मियाँ छोटे मियाँ व लाल बादशाह या चित्रपटांत ते दिसले होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना, तसेच काही सहकलाकारांना असे वाटत होते की, त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतला आहे.

अमिताभ बच्चन यांनी हार…

सूर्यवंशम चित्रपटात राजेश खट्टरदेखील प्रमुख भूमिकेत होते. त्यावेळी त्यांनाही असे वाटत असे की, अमिताभ बच्चन यांनी अभिनय सोडला आहे. नुकतीच राजेश खट्टर यांनी ‘फ्रायडे टॉकिज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत राजेश खट्टर यांनी म्हटले, “मला निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांचा मुलगा व भाऊ या भूमिका साकारण्यासाठी विचारले होते. त्यासाठी त्यांनी मूळ चित्रपट पाहण्यास सांगितला होता; पण तो मूळ चित्रपट पाहण्यास मी नकार दिला. मला बच्चनसाहेब यांच्याबरोबर काम करण्याची संधी गमवायची नव्हती. मला माझ्या निर्णयावर शंका घ्यायची नव्हती.”

पुढे राजेश खट्टर म्हणाले, “जेव्हा अमिताभ बच्चन यांनी हार मानली होती. त्यावेळी सूर्यवंशम हा चित्रपट प्रदर्शित होत होता. त्यांनी इंडस्ट्री सोडली होती. तो त्यांचा पुनरागमनाचा चित्रपट होता. मी विचार केला की, जर अमिताभ बच्चन यांनी पुन्हा इंडस्ट्री सोडली तर? या विचारामुळे मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी गमवायची नव्हती. हा विचार करून मी चित्रपटातील भूमिकेसाठी होकार दिला होता.”

शूटिंगची आठवण सांगत राजेश खट्टर म्हणाले की, पहिल्याच दिवशी अमिताभ बच्चन यांच्याशी ओळख झाली नाही. आम्हाला आमचे सीन सांगितले गेले. मला अमिताभ बच्चन यांच्यावर ओरडायचे आहे, असा सीन होता. त्यामुळे त्याचे दडपण आले होते; मात्र दोन टेकनंतर त्या सीनचे शूटिंग व्यवस्थित पार पडले.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत राजेश खट्टर म्हणाले, “चित्रपटातील एका गाण्याचे आम्ही शूटिंग करीत होतो. तर, अमिताभ बच्चन चालत येतील आणि आमच्याकडे बघतील, त्यांच्या नजरेत घरच्या प्रमुखाची जरब दिसेल, असे सांगितले गेले होते. ते शूट करण्याआधी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तयारीसाठी पाच मिनिटांचा वेळ घेतला होता. त्यानंतर जेव्हा शूटिंग सुरू झाले, त्यावेळी अमिताभ बच्चन त्यांनी जसा लूक दिला, तो मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. मी आजही त्याबद्दल बोलत असेन, तर माझ्या अंगावर काटा येतो.

दरम्यान, सूर्यवंशम हा चित्रपट तमीळ सूर्यवंशम या चित्रपटाचा रिमेक आहे. त्याला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. मात्र, अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.