गेल्या काही दिवसांपासून काजोलचा चित्रपट ‘सलाम वेंकी’ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री रेवती ही या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. काही दिवसांपूर्वी याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काही तासांमध्येच या ट्रेलर प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
‘सलाम वेंकी’चा ट्रेलर पाहता चित्रपटाची कथा आई व मुलाच्या नात्यावर आधारित असल्याचं दिसून येतं. सुजाता (काजोल) व तिचा मुलगा वेंकी (विशाल जेठवा) यांच्या एकत्रित सीनपासूनच चित्रपटाच्या ट्रेलरला सुरुवात होते. वेंकीला कधीही बरा न होणाऱ्या आजाराची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे. एकंदरच हा एक कौटुंबिक चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान संपूर्ण टीम हजर होती आणि त्यांनी मीडियाशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
आणखी वाचा : “मुलींनी जरा…” श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया
अभिनेता राजीव खंडेलवालही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल आणि या भूमिकेबद्दल तो कशी मिळाली याबद्दल बोलताना राजीव म्हणाला, “सर्वप्रथम जेव्हा रेवती यांनी मला या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा मी त्यांना लगेच हो म्हंटलं, कारण जेव्हा रेवती तुमच्याकडे काहीतरी मागतात तेव्हा तुम्ही त्यांना कधीच नाही म्हणून शकत नाही. त्यामुळे मी या भूमिकेसाठी लगेच तयार झालो. नंतर जेव्हा यामध्ये काजोलदेखील मुख्य भूमिकेत आहे हे मला समजलं तेव्हा मी पैशांवरुन सुरू असलेली चर्चादेखील मध्येच थांबवली आणि मी या चित्रपटाला होकार दिला. कारण या २ उत्तम अभिनेत्रींबरोबर काम करायला मिळणं ही खूप मोठी संधी आहे.”
ट्रेलरमध्ये आपल्याला आमिर खानची झलक पाहायला मिळते. आमिर या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. पण त्याची या चित्रपटामधील झलक पाहून प्रेक्षक खूश झाले आहेत. शिवाय राजीव खंडेलवालबरोबर आहाना कुमरा, प्रकाश राज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. रेवतीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या ९ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.