अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), राजेश खन्ना(Rajesh Khanna), जितेंद्र, राज कपूर, मिथुन चक्रवर्ती असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या करिअरमधील अनेक किस्से वेळोवेळी सांगितले जातात. अनेकदा या कलाकारांबाबत संबंधित इतर व्यक्ती आठवणी सांगतात. पडद्यामागे कलाकारांच्या आयुष्यात काय घडते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आता अमिताभ बच्चन यांच्या करिअरला वळण देणारा दीवार हा चित्रपट त्यांना कसा मिळाला, याबद्दल दिग्दर्शक राजीव राय यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.
दीवार चित्रपटाला नुकतीच ५० वर्षे झाली आहेत. हा चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. अभिनेते शशी कपूरदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाची निर्मिती राजीव राय यांचे वडील गुलशन राय यांनी केली होती. एका मुलाखतीत राजीव राय यांनी दीवार चित्रपटासाठी प्रमुख भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांची निवड सलीम-जावेद यांच्या आग्रहामुळे झाली होती, असा खुलासा केला आहे. दीवार चित्रपटाची कथा सलीम खान व जावेद अख्तर यांनी लिहिली होती.
सलीम-जावेद यांच्या जोडीने…
राजीव राय यांनी नुकताच रेडिओ नशाबरोबर संवाद साधला. दीवार चित्रपटासाठी जेव्हा अमिताभ बच्चन यांना कास्ट केले तेव्हा ते फार लोकप्रिय नव्हते. अमिताभ बच्चन यांना ओळख मिळवून देणारा जंजीर चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा होता, त्यावेळी त्यांना दीवार चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी निवडले होते. राजीव राय यांनी या मुलाखतीत बीग बींच्या कास्टिंगबद्दल बोलताना म्हटले, “कास्टिंग ही गोलमेज परिषदेसारखी होती. शशी कपूर हे यशजींचे चांगले मित्र होते, त्यामुळे यशजींच्या सांगण्यावरून शशी कपूर यांना चित्रपटातील भूमिकेसाठी निवडले. सलीम-जावेद यांच्या जोडीने अमिताभ बच्चन यांचे नाव सुचवले. अमिताभ बच्चन या चित्रपटाचा भाग असणे हे त्यांचे श्रेय आहे. त्यांनी माझ्या वडिलांना पटवून दिले की, या व्यक्तीला चित्रपटात भूमिका द्या. जेव्हा आम्ही अमिताभ बच्चन यांना दीवार चित्रपटासाठी निवडले, त्यावेळी त्यांचे असे काही चित्रपट प्रदर्शित झाले नव्हते.”
याबद्दल अधिक बोलताना त्यांनी म्हटले, “मला वाटले नव्हते की जंजीर हा चित्रपट गाजेल. आम्ही चित्रपट बघितला, मग अमिताभ बच्चन यांना चित्रपटात घेतले असे झाले नाही. नंतर त्यांच्या ऑफिसबाहेर रांगा लागल्या होत्या. त्या आजही लागलेल्या दिसतात.”
हा चित्रपट कधी राजेश खन्ना यांच्याबरोबर करण्याचा ठरले होते का? यावर बोलताना त्यांनी म्हटले, “कधीच नाही. मला असे वाटत नाही. राजेश खन्नांना ती स्क्रीप्ट वाचून दाखविली गेली होती. यशजी राजेश खन्नाचे चांगले मित्र होते. त्यांनी राजेश खन्ना यांना सांगितले असणार की ते गुलशनजी यांच्यासाठी पुढचा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. राजेश खन्ना माझे व माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते. आम्ही त्यांच्याबरोबर काम कऱण्यास उत्सुक होतो, पण तसे कधी घडले नाही.
दरम्यान, सलीम खान यांनी एका मुलाखतीत राजेश खन्नांऐवजी अमिताभ बच्चन यांना दीवार चित्रपटात कास्ट करण्याविषयी बोलताना म्हटले होते की, राजेश खन्ना यांना दीवारमधील भूमिकेसाठी कास्ट करणे म्हणजे तडजोड झाली असती. अमिताभ बच्चनच त्या भूमिकेसाठी योग्य होते. गुलशन राय यांनी दीवारसाठी राजेश खन्ना यांची निवड केली होती, पण आम्हाला वाटत होते की अमिताभ बच्चनच या भूमिकेसाठी योग्य आहे. आम्ही त्यांना विनंती केली की, जर तुम्ही अमिताभ बच्चन यांना ही भूमिका दिली, तर हा चित्रपट चालेल. ही भूमिका दुसरी कोणीही केली असती, मात्र ती योग्य कास्टिंग झाली नसती.”
राजेश खन्नांचा वाढता राग आणि इतर गोष्टींना यश चोप्रा कंटाळले होते. तर ऋषी कपूर यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये याबद्दल लिहिले, “मुंबईतील एका हॉटेलमध्ये मी स्नूकर खेळत होतो, त्यावेळी सलीम साहेब तिथे आले आणि मला म्हणाले, सलीम-जावेदला नाही म्हणायची तुझी हिम्मत कशी झाली? त्यावर मी त्यांना उत्तर दिले की, मला ही भूमिका आवडली नाही. त्यावर सलीम खान यांनी अमिताभ बच्चन यांना लॉन्च केल्याबद्दल बढाया मारल्या आणि राजेश खन्नाने त्यांना एकदा नकार दिला होता आणि अमिताभ बच्चन इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्यांचे करिअर संपुष्टात आल्याचे सांगितले. प्रेक्षकांना अमिताभसारखा नायक चित्रपटात पाहिजे होता. सलीम साहेबांनी मला सांगितले, तुला माहीत आहे का? आजपर्यंत आम्हाला कोणीही नाही म्हणू शकले नाही. आम्ही तुझे करिअर संपवू शकतो.”
पुढे ते लिहितात, “जेव्हा मी सलीम खानला विचारले की त्यांच्या मनात काय आहे, त्यांनी म्हटले, ‘तुझ्यासोबत कोण काम करेल? तुला माहिती आहे का, आम्ही राजेश खन्नाला जंजीर चित्रपट ऑफर केला होता आणि त्याने आम्हाला नकार दिला. आम्ही त्याला काही केले नाही, पण आम्ही त्याला पर्याय निर्माण केला. अमिताभ बच्चनला राजेश खन्नाचा पर्याय म्हणून उभे केले आणि राजेश खन्नाचे करिअर संपले. आम्ही तुझ्याबरोबरदेखील अगदी तसेच करू”, असे सलीम खान यांनी म्हटल्याची आठवण ऋषी कपूर यांनी त्यांच्या जीवनचरित्रात लिहिली आहे. हा वाद पुढे वाढवला नसल्याचे ऋषी कपूर यांनी लिहिले आहे.