देशभक्तीवर आधारित ‘तिरंगा’ चित्रपट एकेकाळी खूप गाजला होता. या चित्रपटात अभिनेते राजकुमार आणि नाना पाटेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण या दोघांना एकत्र घेऊन काम करणं खूप कठीण होतं. कारण दोघंही मनमौजी आणि स्वतःच्या अटींवर काम करणारे अभिनेते होते. आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना इम्प्रेस करणारे हे दोघं सेटवर एकमेकांशी मोजकंच बोलायचे. एवढंच नाही तर आपला सीन झाल्यानंतर दोघं दोन वेगवेगळ्या दिशेला जाऊन बसायचे. जेव्हा या चित्रपटाचं कास्टिंग झालं त्यावेळीही राजकुमार यांनी नाना पाटेकरांना अडाणी म्हटलं होतं. जाणून घेऊयात त्यावेळी नेमकं काय घडलं…
चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी त्यांच्या ‘तिरंगा’ चित्रपटासाठी या दोन कलाकारांची निवड केली होती. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात राजकुमार यांनी ब्रिगेडियर सूर्यदेव सिंह आणि नाना पाटेकर यांनी इन्स्पेक्टर शिवाजीराव वाघळे यांची भूमिका साकारली होती. पण या दोघांच्या मूड आणि स्वभावानुसार यांच्याबरोबर काम करणं मेहुल कुमार यांच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं.
मेहुल यांनी या चित्रपटाआधीही राजकुमार यांच्याबरोबर काम केलं होतं त्यामुळे त्यांना राजकुमार यांच्या स्वभावाचा अंदाज होता. जेव्हा तिरंगाचं प्लानिंग होत होतं तेव्हा मेहुल यांच्या मनात पहिलं नाव राजकुमार यांचं आलं. त्यानंतर जेव्हा नाना पाटेकर यांचं नाव या चित्रपटासाठी सुचवण्यात आलं तेव्हा मेहुल यांना माहीत होतं की या दोघांबरोबर काम करण अजिबात सोपं असणार नाही. काही रिपोर्ट्सनुसार जेव्हा मेहुल यांनी राजकुमारला सांगितलं की या चित्रपटात नाना पाटेकर असणार आहेत तेव्हा ते म्हणाले, “मी ऐकलंय की तो अडाणी आहे.”
दरम्यान नाना पाटेकर यांनीही राजकुमार यांच्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं. राजकुमार खूपच स्पष्टवक्ते होते आणि सहलकारांना ते कधीही काहीही बोलायचे असंही त्यांच्या ऐकिवात होतं. त्यामुळे नानांनीही मेहुल यांनी सांगून टाकलं होतं की, “जर राजकुमार यांनी माझ्या कामात लुडबुड केली तर मी चित्रपट अर्ध्यातच सोडून जाईन.” काही रिपोर्टनुसार दोन्ही अभिनेते त्यांचे सीन पूर्ण झाल्यानंतर एकमेकांशी एक अवाक्षरही बोलत नसत. अर्थात दोघंही मूडी स्वभावाचे असले तरीही त्यांनी चित्रपटात उत्तम अभिनय केला होता आणि मेहुल यांचा चित्रपट मात्र खूप हीट ठरला होता. एवढंच नाही तर या चित्रपटाचे डायलॉग खूपच लोकप्रिय ठरले होते.