बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. संजय दत्तच्या अनेक चाहत्यांनी या चित्रपटाला पसंती दाखवली. मात्र, हा चित्रपट फक्त संजय दत्तची मलिन झालेली प्रतिमा पुसण्यासाठी करण्यात आल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. त्यावर आता चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आपलं मत मांडलं आहे. तसेच त्यांनी ‘डंकी’ चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही, असंही म्हटलं आहे.

१९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम स्फोट प्रकरणी संजय दत्तवर आरोप करण्यात आले होते. तसेच त्याला पाच वर्षांची शिक्षाही झाली होती. यानंतर त्याच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी लोकांच्या मनात संजय दत्तविषयी जी प्रतिमा निर्माण झाली आहे ती बदलण्यासाठी केला, असा दावा आजही काही जण करतात. राजकुमार हिरानी नुकतेच कोमल नाहटा यांच्या गेम चेंजर कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी ‘संजू’ चित्रपट का केला याची माहिती सांगितली. तसेच त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोपही त्यांनी फेटाळून लावले आहेत.

‘संजू’ चित्रपट करण्याचं कारण

मुलाखतीमध्ये राजकुमार हिरानी यांनी सुरुवातीला ते संजय दत्तचे फार खास मित्र नव्हते असे सांगितले. त्यांनी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला याचं एकमेव कारण म्हणजे ते कथेसाठी ‘लोभी’ होते, असं सांगितलं आहे. राजकुमार हिरानी म्हणाले, “संजय दत्तने स्वत: त्याची कथा सांगितली आणि ती ऐकल्यावर मला ‘संजू’ चित्रपट करण्याची प्रेरणा मिळाली. संजय दत्तच्या जीवनावर एखादा चित्रपट बनवावा हे आधीच ठरलेलं नव्हतं. एक दिवस त्याने मला कॉल केला आणि भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी तिथे गेल्यावर तो मला त्याच्या आयुष्यात घडलेल्या विविध गोष्टी सांगू लागला. हा तो काळ होता, जेव्हा संजय दत्तबरोबर बोलण्यासाठी कोणी सहज तयार होत नव्हतं.”

पुढे राजकुमार हिरानी यांनी सांगितलं, “मी संजय दत्तच्या घरी गेल्यावर त्याने मला त्याच्या वडिलांबरोबरचा किस्सा सांगितला. त्यानंतर मी घरी गेलो, काही दिवस मी रोज त्याला भेटत होतो आणि त्याने सांगितलेल्या त्याच्या आयुष्यातील गोष्टी ऐकत होतो. त्यावेळी मला या सर्व घटना अद्भुत वाटल्या. यावर एक चित्रपट बनवता येईल असं माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मी त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना भेटलो आणि पुढे हा चित्रपट बनवण्यात आला.”

संजय दत्तची प्रतिमा बदलण्यासाठी हा चित्रपट केल्याच्या दाव्यावरही राजकुमार हिरानी यांनी भाष्य केलं. त्यांनी सांगितलं, “एकदा एका मुलाखतीमध्ये मी संजय दत्तची प्रतिमा बदलण्यासाठी ‘संजू’ चित्रपट केला असं विचारण्यात आलं होत. त्यावेळी त्या व्यक्तींना मी म्हणालो, तुमची अडचण काय आहे? त्याने स्वत: जवळ बंदूक ठेवली होती ते आम्ही चित्रपटात दाखवलं आहे. तो ड्रग्स घेत होता तेही आम्ही दाखवलं आहे. आम्ही चित्रपटात हेही दाखवलं की, तो त्याच्याच चांगल्या मित्राच्या गर्लफ्रेंडबरोबर कसा वागत होता. तुम्हाला काय वाटतं, मी त्याची प्रतिमा बदलण्यासाठी हे केलं? लोकांनी त्याच्याबद्दल आधीच बरीच माहिती वाचली आहे आणि त्यानुसार त्याच्याबद्दल विचार केला जात आहे.”

Story img Loader