‘जवान’ आणि ‘पठाण’च्या घवघवीत यशानंतर शाहरुख खानचा ‘डंकी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी फक्त ३० कोटींचा व्यवसाय केला आहे, अपेक्षेपेक्षा किंग खानच्या या चित्रपटाने फारच कमी कमाई केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार हिरानी व शाहरुख खान हे प्रथमच एकत्र काम करत आहेत. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची फार आतुरतेने वाट बघत होते, शिवाय बॉलिवूडच्या या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं किंग खानबरोबर नेमकं समीकरण कसं आहे हेदेखील लोकांना जाणून घ्यायचं होतं.

याआधी जेव्हा राजकुमार हिरानी त्यांचा पहिला चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’वर काम करत होते तेव्हासुद्धा त्यांच्या डोक्यात शाहरुख खानलाच घेऊन तो चित्रपट करायचा विचार होता. शाहरुखने कथा ऐकून हा चित्रपट करायला नकार दिल्याने नंतर तो संजय दत्तकडे गेला. तेव्हापासूनच राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान एकत्र कधी येणार याची उत्सुकता होती. शाहरुखबरोबर काम करण्यासाठी चक्क २० वर्षं राजकुमार हिरानी यांना वाट बघावी लागली.

याविषयीच त्यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. ‘न्यूज १८’शी संवाद साधताना राजकुमार हिरानी म्हणाले, “मला अजूनही चांगलं आठवतं की जेव्हा मी फिल्मस्कूलमध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा आम्हा सगळ्यांसमोर हा प्रश्न कायम असायचा की पहिल्या चित्रपटात नेमकं कोणाला घ्यायचं? त्यावेळी आम्ही सगळेच एका रूममध्ये बसून एकत्र टीव्ही बघायचो. त्यावेळी ‘सर्कस’ या मालिकेतील काही सीन्स पाहिले होते अन् त्यातील तो तरुण मुलगा चांगलाच लक्षात होता, त्याचं काम मला फार आवडलं होतं.”

आणखी वाचा : “दोनच शब्द आय क्विट…” कुस्तीपटू साक्षी मलिकच्या निवृत्तीवर किशोर कदमांनी केलेली कविता चर्चेत

पुढे ते म्हणाले, “मी मनाशी खूणगाठ बांधली की जेव्हा मी इथून बाहेर पडेन तेव्हा मी त्या तरुण मुलाबरोबर चित्रपट करेन. तिथून पदवी घेऊन बाहेर पडायला मला दोन वर्षं लागली. तोवर शाहरुख खान हा एक मोठा स्टार झाला होता. अन् त्याच्याबरोबर एकत्र काम करण्यासाठी मला तब्बल २० वर्षं वाट पहावी लागली.” राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ने दोन दिवसांत ४९.७ कोटींची कमाई केली आहे. याबरोबरच प्रभासचा ‘सालार’देखील प्रदर्शित झाला असल्याने याचा चांगलाच फटका शाहरुखच्या चित्रपटाला बसला आहे.

Story img Loader