शाहरुख खानचा आगामी ‘डंकी’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचं एक गाणं आणि एक टीझर प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान व दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे प्रथमच एकत्र काम करत आहेत. राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. आपल्या या पहिल्याच चित्रपटात शाहरुखने काम करावं यासाठी राजकुमार हिरानी यांनी पहिले त्याला विचारणा केली. शाहरुखने नकार दिल्याने हा चित्रपट नंतर संजय दत्तकडे आला अन् पुढे त्याने इतिहास रचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाने संजय दत्तच्या करिकीर्दीला एक वेगळंच वळण दिलं. यातील मुन्ना-सर्किट ही जोडी इतकी लोकप्रिय झाली की या चित्रपटाचा सिक्वेलसुद्धा राजकुमार हिरानी यांनी काढला. २००३ मध्ये राजकुमार हिरानी यांनी संजय दत्त, अर्शद वारसी, बोमन इराणी, यांच्याबरोबरच ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा सिक्वल काढला. या चित्रपटात संजय दत्तला आपण भाईगिरीबरोबरच गांधीगीरी करतानाही पाहिलं. प्रेक्षकांना हा भागही पसंत पडला.

आणखी वाचा : ४ महीने कठोर परिश्रम, गोड पदार्थांचा त्याग अन्…; ‘अ‍ॅनिमल’मधील बॉबी देओलच्या रावडी लूकमागील रहस्य जाणून घ्या

परंतु हा चित्रपट खरंतर पूर्णपणे वेगळा होता आणि केवळ संजय दत्तच्या हेयर कटमुळे पूर्ण चित्रपटाची स्क्रिप्ट बदलावी लागली होती हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाचे गीतकार अन् प्रसिद्ध गायक स्वानंद किरकिरे यांनी हा किस्सा सांगितला आहे. ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वानंद किरकिरे यांनी सांगितलं “लगे रहो मुन्नाभाई हा चित्रपट एका वेगळ्याच पद्धतीने बनणं अपेक्षित होतं, परंतु चित्रपटाच्या शूटिंगच्या मध्येच संजय दत्तने स्वतःचा हेयर कट पूर्णपणे बदलला तेव्हा सगळेच लोक चिंतेत पडले अन् तेव्हा चित्रीकरण मध्येच रखडलं.”

पुढे ते म्हणाले, “जेव्हा चित्रपटाचं चित्रीकरण थांबलं तेव्हा राजूसुद्धा चिंताग्रस्त होते, त्यावेळी त्यांनी चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट पुन्हा एका वेगळ्या पद्धतीने लिहून काढली अन् त्यानंतर आपण जो चित्रपट पाहतोय तो सादर करण्यात आला.” या चित्रपटात संजय दत्तसह दिलीप प्रभावळकर, विद्या बालन यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. प्रेक्षकांनी या चित्रपटालाही भरपुर प्रेम दिलं. आता प्रेक्षक राजकुमार हिरानी व किंग खानच्या ‘डंकी’ची आतुरतेने वाट पहात आहेत, तसेच ते ‘मुन्नाभाई सीरिज’च्या तिसऱ्या भागाचीदेखील तितक्याच आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajkumar hirani wrote entire script of lagey raho munna bhai again because of sanjay dutt avn