अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ या चित्रपटात कोरोना काळाचे चित्रण केलेले आहे, लॉकडाऊनच्या काळात मजुरांच्या स्थलांतरावर निर्माण झालेल्या ‘गर्दी’कडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खरोखर कमाल दाखवेल असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी फारशी कमाई केलेली नाही आणि आता दुसऱ्या दिवशीसुद्धा बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल दाखवू शकलेला नाही.
या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ २९ लाखांची कमाई केली. वीकेंडला या आकड्यांमध्ये सुधारणा दिसेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. ‘भीड’चे दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील फारसे चांगले नाही. सैकनिकच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी फक्त ६५ लाखांची कमाई केली आहे.
आणखी वाचा : भगव्या रंगाची साडी, हातात तान्हं बाळ; महागुरूंची लेक श्रिया पिळगांवकरच्या नव्या शॉर्टफिल्मचा टीझर प्रदर्शित
एकूणच या चित्रपटाचे कथानक आणि यावरून निर्माण झालेला वाद यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल असा बऱ्याच लोकांचा समज होता. आता येणारा आठवडा यासाठी आणखी कठीण असणार आहे, कारण येत्या आठवड्यात अजय देवगणचा बहुचर्चित ‘भोला’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याच्यासमोर ‘भीड’ टिकणार का हे येणारा काळच ठरवेल.
चित्रपटात राजकुमार राव हा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे आणि भूमी पेडणेकर, दिया मिर्झा यांचीही यात मुख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या कथानकाला साजेसं असं खिळवून ठेवणारं पार्श्वसंगीतही आहे. याबरोबरच पंकज कपूर, आशुतोष राणा, विरेन्द्र सक्सेनासारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ हा चित्रपट २४ मार्चला देशभरात प्रदर्शित झाला.