बॉलिवूडमध्ये आता स्टार किड्सना मागे टाकून अनेक कलाकारांनी आपली छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. राजकुमार राव बॉलिवूडमधला सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचा हा प्रवास खडतर होता. त्याच्या या प्रवासाबददल त्याने अनेकदा भाष्य केले आहे. पण आता त्याने त्याचा एक धक्कादायक अनुभव सांगत बॉलिवूडची दुसरी बाजूही समोर आणली आहे.
बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांना अनेकदा दुय्यम वागणूक दिली जाते. एखाद्या चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी त्यांना अथक प्रयत्न करावे लागतात. बऱ्याचदा त्यांना नकार दिले जातात. पण या सगळ्यावर मात करून आपली छाप पडणारे अनेक कलाकार आज आघाडीवर आहेत. राजकुमार राव हा त्यातलाच एक. सहाय्यक भूमिका करत त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याच्या अभिनय कौशल्याने तो आता प्रमुख भूमिकाही साकारताना दिसतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूडमधील या भेदभावाबद्दल भाष्य केलं.
आणखी वाचा : ‘पठाण’च्या प्रदर्शनाआधीच त्याच्या सिक्वेलबद्दल शाहरुखचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “आम्ही या चित्रपटासाठी…”
राजकुमार राव म्हणाला, “माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, मी हिरोच्या रोलसाठी ऑडिशन देणे बंद केले होते. कारण मी जेव्हा हिरोच्या रोलसाठी ऑडिशन द्यायला जायचो, त्यावेळी माझ्या दिसण्यामुळे मला कायम हिरोच्या मित्राच्या रोलसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला जायचा. मी फार हँडसम अभिनेता नाहीये. पण दिबाकर बॅनर्जी यांनी माझ्यामध्ये काहीतरी वेगळे बघितले.”
यापूर्वीही राजकुमारने त्याच्या दिसण्यावरुन त्याला नकारांचा अनेकदा सामना सामना करावा लागल्याचे सांगितले होते. काहींनी त्याला लीड रोलसाठी त्याची उंची फार कमी आहे असे सांगितले. तर काहींनी त्याच्या शरीरयष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काहींनी राजकुमारच्या भुवया आयब्रोचा केसांमुळे त्याला प्रमुख भूमिकेसाठी कास्ट केले नव्हते. या सगळ्यामुळे त्याने बरेच दिवस हिरोच्या ऑडिशनसाठी जाणे देखील बंद केले, असा खुलासा त्याने केला.
हेही वाचा : राजकुमार राव लवकरच होणार बाबा? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
दरम्यान आता राजकुमारच्या आगामी चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे. लवकरच तो ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटानंतर त्याचे ‘भीड’ आणि ‘मिस्टर अॅन्ड मिसेस माही’ असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याची ‘गन्स अॅन्ड गुलाब’ ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये त्याने दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमानसह काम केले आहे.