यंदाच्या वर्षाची सुरुवात बॉलिवूडसाठी उत्तम ठरली. किंग खान शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर कल्ला केला. जगभरात या चित्रपटाने १००० कोटींहून अधिक कमाई केली. ‘पठाण’बरोबर बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. ‘पठाण’ समोर मात्र संतोषी यांचा हा चित्रपट सपशेल आपटला. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पूर्णपणे पाठ फिरवली.
नुकतंच या चित्रपटाच्या अपयशाबद्दल राजकुमार संतोषी यांनी भाष्य केलं आहे. हा चित्रपट ‘पठाण’बरोबर प्रदर्शित करायचा निर्णय योग्य नव्हता अशी खंतदेखील संतोषी यांनी व्यक्त केली आहे. ‘गांधी गोडसे’ या चित्रपटातून एक काल्पनिक कथानक मांडण्यात आलं होतं ज्यात गांधीजी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारांतील युद्ध प्रेक्षकांसमोर वेगळ्या पद्धतीने सादर केलं गेलं होतं, पण इतका ज्वलंत विषय असूनही प्रेक्षकांनी या चित्रपटाला ठेंगा दाखवला अन् ‘पठाण’साठी बॉक्स ऑफिसवर गर्दी केली.
आणखी वाचा : थलाईवा रजनीकांत ते मक्कल सेल्वन विजय सेतुपती; दाक्षिणात्य सुपरस्टार्सच्या नावामागील बिरुदांचा अर्थ काय?
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकुमार संतोषी म्हणाले की या दोन्ही चित्रपटांचं आमने सामने येणं ही एक प्रकारची चूक होती आणि ‘गांधी गोडसे’ हा चित्रपट ‘पठाण’बरोबर प्रदर्शित करायला नको होता अशापद्धतीने त्यांनी या मुलाखतीमध्ये चूक कबूल केली आहे. याआधी मात्र चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी त्यांनी वेगळं वक्तव्य केलं होतं. ज्या लोकांना अशा प्रकारचा नाच-गाणी नसलेला कंटेंट बघायला आवडतो ते लोक आमचा चित्रपट बघायला येतील असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
‘गांधी गोडसे’नंतर यावर्षी राजकुमार संतोषी आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘बॅड बॉय’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं आहे अन् तो २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमोशी चक्रवर्ती पदार्पण करणार आहे.