बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या राजकुमार संतोषी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजकुमार संतोषी यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावत असताना चेकच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून जमा करण्याचेही आदेश दिले आहेत.
राजकुमार संतोषी यांनी घायल, घातक यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. संतोषी यांनी जामनगरचे व्यावसायिक अशोकलाल यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले होते. मात्र ते पैसे परतच केले नाहीत. यानंतर अशोकलाल हे राजकुमार संतोषींच्या विरोधात न्यायालयात गेले. ज्यानंतर जामनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
२०१५ मधलं आहे हे प्रकरण
राजकुमार संतोषी यांचं चेक बाऊन्सचं हे प्रकरण २०१५ मधलं आहे. २०१९ मध्ये राजकुमार संतोषी न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी अशोकलाल यांच्या वकिलांनी सांगितलं की राजकुमार संतोषी आणि अशोकलाल हे चांगले मित्र आहेत. २०१५ मध्ये संतोषी यांनी अशोकलाल यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले. ही रक्कम परत करताना संतोषी यांनी अशोकलाल यांना १० लाखांचे १० चेक दिले होते. पण २०१६ मध्ये हे चेक बाऊन्स झाले.
१८ व्या सुनावणीला संतोषी हजर झाले
दरम्यानच्या काळात अशोकलाल यांनी संतोषी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर अशोकलाल यांनी जामनगर न्यायालयात धाव घेतली. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर १७ वेळा सुनावणी झाली. यावेळी राजकुमार संतोषी न्यायालयात हजर झाले नाही. १८ व्या सुनावणीवेळी राजकुमार संतोषी न्यायालयात हजर झाले. बाऊंस झालेल्या प्रत्येक चेकसाठी संतोषी यांना १५ हजार द्यावे लागतील, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, आता न्यायालयाने कठोर निर्णय घेतलाय. प्रत्येक चेकच्या दुप्पट रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राजकुमार संतोषी यांची सिनेक्षेत्रातील कारकीर्द
राजकुमार संतोषी प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी सनी देओलसह शाहिद कपूर, रणबीर कपूर, कतरिना कैफ, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार अशा दिग्गज कलाकारांसह काम केलं आहे. त्यांनी ‘खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘दामिनी’ अशा अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.याशिवाय ‘पुकार’, ‘लज्जा’, ‘दिल है तुम्हारा’ आणि ‘अंदाज या सिनेमांचे त्यांनी लेखन केलं आहे.