बॉलीवूडमधील एक उत्कृष्ट कॉमेडियन आणि अभिनेता राजपाल यादवने चाहत्यांची हात जोडून माफी मागितली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा ‘भूल भुलैया ३’ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून दोन दिवसांपूर्वी त्याने शेअर केलेला दिवाळीचा व्हिडीओ डिलिट करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. त्याला हा व्हिडीओ केवळ डिलिट करावा लागला नाही तर नव्या पोस्टद्वारे चाहत्यांची माफीही मागावी लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘भूल भुलैया ३’ मध्ये ‘छोटा पंडित’ या लोकप्रिय भूमिकेत असलेल्या राजपाल यादवने दिवाळीच्या दिवशी चाहत्यांची माफी मागितली. यात त्याने हात जोडून सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी माझ्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केला गेला होता, मी तो व्हिडीओ हटवला आहे. या व्हिडीओमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो.”

हेही वाचा…‘या’ देशाने ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’च्या प्रदर्शनावर घातली बंदी, कारणं नेमकी काय? वाचा

राजपाल यादवने माफी का मागितली?

दोन दिवसांपूर्वी राजपाल यादवने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने लोकांना सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. यात पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून दिवाळीत फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते. तसेच, फटाक्यांच्या आवाजामुळे प्राण्यांना भीती वाटते असेही त्याने सांगितले. मात्र, या व्हिडीओवर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

“मी माफी मागतो…”

राजपाल यादवने चाहत्यांची माफी मागताना नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने लिहिले, “मी मनापासून माफी मागतो. माझा उद्देश दिवाळीच्या आनंदाला कमी करणे नव्हता… दिवाळी आपल्या सर्वांसाठी आनंद आणि प्रकाशाचा सण आहे आणि तो सर्वांसाठी सुंदर बनवणे हाच खरा सण आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि प्रेम. चला, आपण मिळून ही दिवाळी खास बनवूया.”

हेही वाचा…‘बॉबी’ सिनेमासाठी ‘या’ अभिनेत्याने तयार केला होता डिंपल कपाडिया यांचा लूक; खुलासा करत म्हणाल्या, “मला खूप त्रास…”

राजपाल यादवच्या भूल भुलैया ३ ची सिंघम अगेनशी टक्कर

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ एकाच दिवशी (१ नोव्हेंबर २०२४) प्रदर्शित झाले असून दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दोन सिनेमांमध्ये प्री बुकिंग पासूनच क्लॅश सुरु झाला आहे. राजपाल यादवची ‘भूल भुलैया ३’ मध्ये मुख्य भूमिका आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रुह बाबा’च्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये विद्या बालन पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित या नवीन कलाकारांची भर पडली आहे. तर ‘सिंघम अगेन’ हा रोहित शेट्टीच्या ‘कॉप युनिव्हर्स’मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे, ज्यामध्ये अजय देवगण, करीना कपूर खान, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajpal yadav apology for diwali video amid bhool bhulaiyaa 3 release psg