हृतिक रोशन(Hrithik Roshan) हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘कहो ना प्यार है’ ते ‘फायटर’ अशा अनेक चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हृतिक रोशनचे वडील व प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन हे मुलाखतींमधून चित्रपट शूटिंग करताना घडलेले किस्से व त्यांच्या खासगी आयुष्याविषयीदेखील अनेक खुलासे करताना दिसतात. आता एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी हृतिकने स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले होते असे वक्तव्य केले असून त्यामागे काय कारण होते, याबद्दल खुलासा केला होता.
त्याने स्वत:वर खूप…
राकेश रोशन यांनी नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हृतिकला तोतरे बोलण्याची समस्या होती असे सांगितले. यावर राकेश रोशन म्हणाले, “मला त्याच्यासाठी वाईट वाटायचे. त्याला खूप काही बोलायचे असायचे. तो खूप हुशार व उत्तम शिक्षण घेतलेला मुलगा होता. पण, बोलताना तो अडखळायचा, त्यामुळे स्वत: मागेच राहायचा. मला आठवतं. एकदा आम्ही दुबईत होतो, त्याला फक्त थँक्यू दुबई असे म्हणायचे होते. मात्र, तो द या शब्दापाशी येऊन अडखळला. ते वाक्य पूर्ण व्यवस्थित म्हणता यावे, म्हणून त्याने स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले. त्यामुळे मला वाईट वाटायचे. त्याने स्वत:वर खूप मेहनत घेतली. तो सकाळी लवकर उठत असे आणि एक तासभर वर्तमानपत्रे वाचत असे. हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा भाषांतील तो वर्तमानपत्र वाचत असे. आता तो गेल्या १०-१४ वर्षांपासून बोलताना अडखळत नाही किंवा तोतरे बोलत नाही”, असे म्हणत हृतिक रोशनने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतल्याचे राकेश रोशन यांनी सांगितले.
हृतिक रोशनने त्याच्या अनेक मुलाखतीत त्याला लहानपणी तोतरे बोलण्याच्या समस्येला सामोरे जावे लागल्याचे म्हटले आहे. शालेय जीवनात या समस्येचा सामना करणे किती आव्हानात्मक होते, असेही अभिनेत्याने सांगितले.
हृतिक रोशनच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर अभिनेत्याने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ‘क्रिश’, ‘कोई मिल गया’ या चित्रपटांतदेखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्याच्या या चित्रपटांनादेखील मोठे यश मिळाले. २०२४ मध्ये हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याबरोबर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द रोशन्स या डॉक्युमेंटरीमध्येदेखील तो दिसला होता. आता अभिनेता लवकरच ‘वॉर २’मध्येदेखील दिसणार आहे.