‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyar Hai) या चित्रपटातून अभिनेता हृतिक रोशन(Hrithik Roshan)ने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट जितका लोकप्रिय ठरला तितकीच चर्चा अभिनेत्याच्या अभिनयाचीसुद्धा झाली. हृतिक रोशन भविष्यातील बॉलीवूडचा चेहरा ठरेल, असेही म्हटले जात होते. हा चित्रपट राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता.
‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट १४ जानेवारीला रिलीज झाला आणि एक आठवड्यानंतर राकेश रोशन त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत असताना, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दोन गोळ्या लागल्यानंतर राकेश रोशन यांनी स्वत:च दवाखान्यात धाव घेतली होती. राकेश रोशन यांच्यावर ज्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्या गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचा संबंध अंडरवर्ल्डशी होता. ९० च्या दशकाच्या शेवटी आणि २००० च्यादशकाच्या सुरुवातीला अनेक कलाकार, निर्माते व दिग्दर्शकांना अंडरवर्ल्डकडून धमक्यांचे फोन यायचे. १९९७ मध्ये जेव्हा गुलशन कुमार यांची हत्या झाली, त्यावेळी अंडरवर्ल्ड पोकळ धमक्या देत नसल्याचे उघड झाले. आता राकेश रोशन यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांच्यावर जो हल्ला झाला होता, त्याबद्दल त्यांनी खुलासा केला आहे.
काय म्हणाले राकेश रोशन?
राकेश रोशन यांनी नुकतीच ‘बॉलीवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांना असे वाटत होते की, हृतिकने त्यांच्या पैशातून निर्माण केलेल्या चित्रपटात काम करावे. पण, जेव्हा त्याने नकार दिला, त्यावेळी त्याचे परिणाम भोगावे लागले. मी त्यांना असे संकेत कधीही दिले नाहीत, की हृतिक त्यांच्या चित्रपटात काम करील. हृतिककडे तारखा नाहीत, असं म्हणत मी वेळ पुढे ढकलत राहिलो. त्यांनी इतर निर्मात्यांकडून तारखा घेऊन, त्यांना त्या तारखा द्याव्यात, असे सांगितले; पण ते करण्यास मी नकार दिला. माझ्या मुलाच्या तारखा मी इतर कोणाला तरी दिल्या होत्या. त्यानंतर त्या तारखा त्यांना देणे शक्य नव्हते. मी कधीच हार मानली नाही. आमच्यापैकी अनेकांना भीती व चिंता यांचा सामना करावा लागला. त्यामुळे आम्ही काही क्रिएटिव्ह बनवू शकत नव्हतो.”
राकेश रोशन यांच्यावर हल्ला जो झाला होता, त्यानंतर हृतिक रोशनने सिमी गरेवाल यांना मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राकेश रोशन यांच्यावर झालेल्या हल्ल्याला तो प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचे हृतिक रोशनने म्हटले होते. त्यामुळे त्याने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले होते.