ड्रामा क्वीन राखी सावंतला दोन दिवसांपूर्वी मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली होती. राखीविरोधात मॉडेल शर्लिन चोप्रानं तक्रार दाखल केली होती. राखीने शर्लिनचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. अटकेनंतर पोलिसांनी राखीची दिवसभर चौकशी केली होती. त्यानंतर तिची सुटका करण्यात आली होती.
Video: राखी सावंतची सुटका! पोलीस स्टेशनबाहेर पडल्यावर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली, “मी माझ्या…”
सध्या राखी सावंत तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. शिवाय तिची आई रुग्णालयात दाखल आहे. तिच्या आईवर कर्करोग व ब्रेन ट्युमरचे उपचार सुरू आहेत. अशातच राखीला अटक झाल्याच्या बातमीने सर्वांना धक्का बसला होता. पण दिवसभर पोलिसांनी राखीची चौकशी आणि नंतर राखीला सोडण्यात आलं होतं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राखीने पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिली आहे.
शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीबद्दल राखी म्हणाली, “काही लोक मला फसवण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते खूश राहावे अशी मी प्रार्थना करते,” असं राखीने सांगितलं. यावेळी तिने तिच्या आईच्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली. “आईची प्रकृती मागच्या दोन दिवसांपेक्षा चांगली आहे. डॉक्टरांचं उपचारासाठी आणि जनतेचे प्रार्थनेचे आणि शुभेच्छांसाठी खूप खूप आभार”, असं राखी म्हणाली.
दरम्यान, राखी सावंतने पोलीस चौकशीनंतर तिच्या इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली होती. “जगातील सगळ्यात महागडं द्रव्य म्हणजे अश्रू. अश्रूंमध्ये १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात. त्यामुळे कोणालाही दुखावण्याच्या आधी दोनदा विचार करा”, असं राखीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.