Pahalgam Terror Attack: गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झाला. पहलगाम येथील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतच नाही तर जगभरातून या दहशतवादी हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी संताप व्यक्त करताना दिसत आहे. अशातच सुनील शेट्टीने पुढची सुट्टी काश्मीरमध्ये एन्जॉय करणार असल्याचं सांगितलं. तसंच राखी सावंतने देखील काश्मीर जाण्याचा निर्धार केला आहे. ती चाहत्यांना काश्मीर जाण्याचं आवाहन करताना दिसत आहे.

राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बुरखा घालून संवाद साधताना दिसत आहे. राखी म्हणते, “सलाम वालेकुम सभी को, नमस्ते, सत श्री अकाल, जय भारत, जय भीम, जय हिंदुस्तान, भारत माता की जय. आता आनंदी आहात. आपण सगळे एक आहोत. आपल्या हिंदुस्तानातून मुस्लिमांना कोणीही बाहेर काढू शकत नाही. भारत जितका हिंदूंचा आहे, तितकाच मुसलमानांचा देखील आहे. हिंदू-मुस्लिम असं करू नका. लहान मुलांसारख वागू नका. मोठे व्हा. जरा देवावर दया करा. देवाला इतक्या वेदना होतं आहेत की, मी या लोकांना निर्माण केलं आहे आणि ही सर्व माझी मुलं आहेत, माझी माणसं आहेत. पण, का लढत आहेत आणि मरत आहेत. यांना काय पाहिजे?”

पुढे राखी सावंत म्हणाली, “मी माझ्या पुढच्या सुट्टीत काश्मीरला जाणार आहे. काश्मीरला जाणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आपली पुढची सुट्टी काश्मीरमध्ये असली पाहिजे. काश्मीर आपलं आहे. काश्मीरमधील सर्व काश्मिरी भाऊ आणि बहिणी आपले आहेत. तेच आपलं पर्यटन आहे. त्यामुळे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आपण सर्वजण काश्मीरा गेलं पाहिजे. शपथ घ्या. भारताबाहेर जाणार नाही, काश्मीरला जाणार. मी काश्मीरला जाणार आहे. यात तुम्ही माझी साथ द्याल? त्या सर्वांनी आपला जीव गमावून आपल्याला वाचवलं आहे. ज्याप्रमाणे सैनिक आपला जीव गमावतात, तसंच काश्मिरी लोकांनी देखील आपला जीव देऊन आपल्याला वाचवलं आहे. घाबरू नका, आपण सगळेजण काश्मीरला जाऊ. मी तुमच्याबरोबर असेन. कोण-कोण माझ्याबरोबर येणार…”

दरम्यान, याआधी राखी सावंतने सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नये, अशी मागणी केली होती. तिचा हा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. “सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नये कारण आता ती भारताची सून आहे, ती सचिनची पत्नी आहे आणि त्याच्या मुलाची आई आहे,” अशी राखी सावंत म्हणाली होती.