गेले काही दिवस राखी सावंत पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करत आहे. राखी आता म्हैसूरला पोहोचली आहे. ती आदिलच्या म्हैसूर येथील घरी गेली. पण यावेळी आदिलच्या घराला टाळा होता. आदिलसह त्याच्या कुटुंबियांवरही राखीने गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान प्रत्येक दिवशी राखी आदिलबाबत नवनवीन खुलासे करत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आदिल तुरुंगात असताना नेमकं काय सुरू आहे? हे राखी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिसते. यावेळीही तिने पापाराझी छायाचित्रकरांसमोर आपलं दुःख बोलून दाखवलं. यावेळी राखीला भावना अनावर झाला. तिने स्वतःला त्रास करुन घेतला. इतकंच नव्हे तर मुलाखत देत असताना राखीने स्वतःच्याच कानाखाली मारली.
राखी स्वतःला कानाखाली मारत म्हणाली, “नमाज पठण मी सातत्याने करत आहे. कारण आदिलने मला सांगितलं होतं की, तू नमाज पठण करशील तरच मी तुझा स्वीकार करेन. पण नमाज पठण करुनही त्याचा मला काही त्रास होणार नाही. मात्र मला स्वतःला मारावसं वाटत आहे. मी आदिलवर विश्वास का ठेवला? मी प्रेम का केलं? माझा पहिला नवरा रितेशनेही गुन्हा केला होता. पण त्याने मला इतका त्रास कधीच दिला नाही.”
राखी स्वतःला अधिकाधिक त्रास करुन घेत असल्याचं दिसून येत आहे. आदिल विरोधात मैसूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका इराणी विद्यार्थिनीने वीवी पुरम पोलीस ठाण्यात कलम ३७६, ४१७, ४२०, ५०४ आणि ५०६ नुसार बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही इराणी विद्यार्थिनी डॉक्टर ऑफ फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती. या विद्यार्थीनीला पाठिंबा देण्यासाठी राखी म्हैसूरला पोहोचली आहे.