बी-टाऊनची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत काही ना काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. सध्या तिचं आदिल खानशी झालेलं लग्न आणि त्यानंतर निर्माण झालेला वाद यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मारहाणीसह अनेक आरोप केल्यानंतर अभिनेत्रीने तिचा पती आदिल खान दुर्रानी याला तुरुंगात पाठवले आहे. आदिलने आपली फसवणूक केल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
राखी दररोज मीडियासमोर येऊन वेगवेगळी वक्तव्य करताना सध्या आपल्याला दिसत आहे. नुकतंच तिने घटस्फोट घेणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. इतकंच नव्हे तर राखीने तिला पोटगीदेखील नको असल्याचा खुलासा केला आहे. ‘टेली खजाना’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राखीने सांगितलं, “माझा जीव गेला तरी मी आदिलला घटस्फोट देणार नाही. माझ्या आयुष्याशी कुणीही खेळू शकत नाही, मी मरेपर्यंत लढत राहीन. मी त्याला घटस्फोट देणार नाही.”
आणखी वाचा : अभिनेते जावेद खान यांचं दुःखद निधन; ‘लगान’च्या शेवटी “हम जीत गये” अशी घोषणा करणारा नट काळाच्या पडद्याआड
जामीन नामंजूर झाल्याने आदिलच्या वकिलांनी कोर्टाला विनंती केली आहे. १५ फेब्रुवारी म्हणजेच आजच या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यावरच आदिलला जामीन मिळणार कि नाही हे ठरणार आहे. त्याला जामीन मिळू नये यासाठी राखी जीवाचं रान करत आहे. राखी हे सगळं पोटगीसाठी, पैसे मिळवण्यासाठी करत असल्याचे आरोपही तिच्यावर केले जात आहेत.
याविषयी राखी म्हणाली, “मला पैसेच उकळायचे असते तर मी माझा आधीचा पती रितेश जो करोडपती आहे त्याच्याकडून घेतले असते, पण मी तसं वागले नाही. माझं खरं लग्न फक्त आणि फक्त आदिलशी झालं आहे. मी सध्या पोटगीचा नाही तर त्याला जामीन मिळू नये याचा विचार करत आहे. कारण मला असं सांगण्यात आलं आहे की जर त्याला जामीन मिळाला तर तो निवेदिताशी लग्न करेल.” राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ओशाविरा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर आदिलला १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.