अभिनेत्री राखी सावंतच्या संसारात वादळ आलं आहे. राखीने पती आदिल खानविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ओशिवारा पोलिसांनी आदिलला ताब्यात घेतलं आहे. अटक केल्यानंतर आदिलला अंधेरी कोर्टातही हजर करण्यात आलं होतं. आदिलवर गंभीर आरोप केल्यानंतर राखीच्या भावाने त्याचं पहिलं लग्न झाल्याचा गौप्यस्फोट मीडियासमोर केला होता. यावर आता राखीने मौन सोडलं आहे.
राखीने आदिलवर फसवणुकीचे आरोप केले होते. आईच्या निधनानंतर दोनच दिवसांनी राखीने आदिलच्या अफेअरबाबत खुलासा केला होता. आदिलने मारहाण केल्याचा आरोपही राखीने केला होता. आता राखीच्या भावाने त्याचं पहिलं लग्न झालं असल्याचं सांगितल्यानंतर राखीने याबाबतही भाष्य केलं आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आदिलच्या पहिल्या लग्नाबाबत राखीला विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना राखी म्हणाली, “हे खरं आहे. याचे पुरावे मी तुम्हाला देईन”.
हेही वाचा>> स्मृती इराणींच्या होणाऱ्या जावयाचं अॅपल कंपनीशी खास कनेक्शन, NRI अर्जुन भल्लाबाबत जाणून घ्या
“गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरुन आदिल मला मारहाण करायचा.माझ्या आईच्या सांगण्यावरुन मी याबाबत बोलले नव्हते. लग्न झालंय तर थोडफार सहन कर, असं आई म्हणाली होती. आदिलवर अनेक गुन्हे दाखल आहेत. कारचोरीचा गुन्हाही त्याच्यावर आहे”, असंही पुढे राखी म्हणत आहे. याशिवाय राखीने आदिलवर पैसे घेतल्याचा आरोपही केला आहे.
राखी सावंत व आदिल खानने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. सात महिन्यांनी राखीने याचा खुलासा केला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राखीबरोबर लग्न केल्याचं आदिलने आधी मान्य केलं नव्हतं. अनेक दिवसांच्या ड्राम्यानंतर त्याने राखीबरोबर लग्न केलं असल्याचं म्हटलं होतं.